भाजपात प्रवेश करा अन् 40 कोटी मिळवा;आमदारांना ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 09:41 AM2019-07-04T09:41:30+5:302019-07-04T09:42:50+5:30
भाजपात प्रवेश करण्यासाठी मला 40 कोटींची ऑफर मिळाली मात्र मी त्यास नकार दिला असं जेडीएसच्या आमदाराने सांगितले.
म्हैसुर - कर्नाटकात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयानंतर सत्ताधारी पक्षात येण्यासाठी अनेक विरोधी पक्षाचे आमदार उत्सुक आहेत. कर्नाटकातील पेरियापटना येथे जेडीएस आमदार महादेव यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात आरोप लावला आहे, की काँग्रेस आमदार रमेश जरकिहोली यांनी काँग्रेस पक्षात राहण्यासाठी 80 कोटी रुपये मागितले आहेत तर भाजपात प्रवेश करण्यासाठी मला 40 कोटींची ऑफर मिळाली मात्र मी त्यास नकार दिला असं जेडीएसच्या आमदाराने सांगितले.
काँग्रेस विधिमंडळ गटनेते सिद्धरमय्या यांनी दावा केला आहे की, जरकिहोली यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्याचदरम्यान जेडीएस आमदाराने हा आरोप लावला आहे. जनतेच्या प्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी विकासकामे करण्याची गरज आहे अन्यथा राजीनामा, ब्लॅकमेलिंग आणि धमकी असा ड्रामा सुरु होतो.
जेडीएस आमदाराने दावा केला की, माझ्या उपस्थितीत जरकिहोली यांनी 80 कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच मला भाजपात सहभागी होण्यासाठी 40 कोटींची ऑफर दिली मात्र मी भ्रष्टाचारविरोधी ब्युरोकडे तक्रार करण्याची धमकी दिली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते सिद्धरामय्या यांनी भाजपा कर्नाटक सरकार पाडण्याचा डाव करतंय असा आरोप केला आहे.
गतवर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलखावे खात असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ही अस्थिरता अधिकच वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी सिद्धारामय्या यांनी एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार डिसेंबर महिन्यांपर्यंत टिकल्यास काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येईल. त्याद्वारे बंडाचा सूर आळवणाऱ्या आमदारांना शांत करता येईल असा मास्टर प्लॅन तयार केला होता. त्यामुळे पुढील काळात कर्नाटकमध्ये नेमकं काय घडेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.