नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गैरमुद्यांकडे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भ्रष्टाचाराचा राग आळवत आहे. आपण कधीही स्वत:च्या, कुटुंबाच्या किंवा मित्र परिवाराच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केलेला नाही, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी मोदी सरकारवर तोफ डागली.मोदी सरकारच्या काळात लोकशाही संस्था धोक्यात आहे आणि जलद आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या नावावर आता कल्याणकारी राज्याची संकल्पनाच पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येत आहे, असा स्पष्ट आरोप मनमोहनसिंग यांनी केला. ते नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलत होते. २ जी लायसेन्सप्रकरणी सहकार्य न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी मनमोहनसिंग यांनी आपल्याला दिली होती, असा आरोप ‘ट्राय’चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहनसिंग यांनी हे वक्तव्य केले.संपुआच्या कार्यक्रमांना नव्या रूपात सादर केले जात आहे आणि हा भाजप सरकारने घेतलेला पुढाकार असल्याचे मार्केटिंग करण्यात येत आहे, असा स्पष्ट आरोप मनमोहनसिंग यांनी केला. दरम्यान, डॉ. मनमोहनसिंग हे कळसूत्री बाहुले आहेत आणि ते उजळ माथ्याने खोटे बोलत आहेत, अशी बोचरी टीका भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)४संपुआ सरकारवर लावण्यात आलेला ‘धोरण लकव्या’चा आरोप फेटाळताना मनमोहनसिंग पुढे म्हणाले, माझ्या सरकारने सत्ता सोडली त्यावेळी भारत जगात सर्वाधिक वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था होती. परंतु विद्यमान सरकारअंतर्गत अर्थव्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. ४अतिशय पक्षपाती आणि सांप्रदायिक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी भूतकाळाचे सातत्याने पुनर्लेखन केले जात आहे. असंतोष दडपला जात आहे.
स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केला नाही
By admin | Published: May 27, 2015 11:49 PM