अभिमानास्पद! कार्यालयातील सफाई कर्मचारी महिला झाली ग्रामपंचायतीची अध्यक्षा
By देवेश फडके | Published: January 1, 2021 01:51 PM2021-01-01T13:51:45+5:302021-01-01T13:56:03+5:30
देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या. ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी असलेली एक महिला त्याच ग्रामपंचायतीची अध्यक्षा झाल्याचे समोर आले आहे.
तिरुवनंथपुरम : एखादी व्यक्ती आपल्या मेहनतीने आणि कष्टाने कोणतेही यशोशिखर सर करू शकते. असाच एक अनुभव केरळमधील कोल्लम जिल्ह्यात असलेल्या पठाणपूरम येथील रहिवासी महिलेला आला आहे. कोल्लम जिल्ह्यातील पठाणपूरम ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी असलेली एक महिला त्याच ग्रामपंचायतीची अध्यक्षा झाल्याचे समोर आले आहे. भारतीय लोकशाहीची आणखी एक वेगळी बाजू यानिमित्ताने उजेडात आल्याचे बोलले जात आहे.
पठाणपूरम पंचायत कार्यालयातील एक महिला थेट ग्रामपंचायत अध्यक्षा झाली असून, गेल्या १० वर्षांपासून ती महिला याच कार्यालयात आपली सेवा बजावत होती. ए. आनंदवल्ली असे या महिलेचे नाव आहे. ए. आनंदवल्ली या पंचायत कार्यालयात कचरा काढणे, स्वच्छता राखणे, कार्यालयात काम करणाऱ्यांच्या चहा-पानाची व्यवस्था करणे अशी कामे करत होत्या. अलीकडेच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या. केरळमध्ये डाव्या संघटनांनी जोरदार मुसंडी मारत अनेक जागांवर विजय मिळवला आहे. ए. आनंदवल्ली यांनी पठाणपूरम ग्रामपंचायत अध्यक्ष निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुमारे ६५४ मतांनी विजय मिळवला.
केरळमधील ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल हाती आल्यानंतर ए. आनंदवल्ली फारच भावूक झाल्या. विजयानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, पक्षांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. ही बाब केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातच घडू शकते. पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत मी पक्षाची ऋणी राहीन, असे त्यांनी सांगितले. ए. आनंदवल्ली यांचे कुटुंबीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी निगडीत आहेत. सन २०११ मध्ये ए. आनंदवल्ली या पठाणपूरम पंचायत कार्यालयात रुजू झाल्या होत्या.