उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे निवडणूक आयोगाने (Election comission) या राज्यांना निर्देश दिले आहेत. जे अधिकारी गेल्या 4 वर्षांच्या काळात तीन वर्षे एकाच जिल्ह्यात आहेत त्यांची बदली करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. पंजाबने आजच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
निवडणूक आयोगाने आज राज्यांच्या मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभेचा कार्यकाळ हा मार्च 2022 मध्ये संपणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 14 मे रोजी संपणार आहे. तीन वर्षांहून अधिक काळ कोणताही अधिकारी त्या जिल्ह्यात निवडणूक जबाबदारी किंवा ड्युटीवर राहणार नाही अशी अपेक्षा आहे. तसेच न्यायालयात गुन्हेगारी खटला प्रलंबित असलेला अधिकारी देखील तैनात करू नये असे या पत्रात म्हटले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग अशा प्रकारचे आदेश जारी करतो. याचे मुख्य कारण हे अधिकारी निवडणूक प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करू नयेत तसेच प्रक्रिया निष्पक्ष आणि स्वतंत्र रहावी.