- ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 6 - टॅक्सीने प्रवास करताना प्रवासी बाहेर कमी आणि टॅक्सीच्या चाकाहूनही वेगाने धावणा-या मीरटकडे पाहत असतो. अनेकदा जास्त भाडं आकारण्यावरुन प्रवाशांची आणि टॅक्सीचालकांची भांडणं होताना आपण पाहतो. भाड्यामध्ये 5 रुपये जरी जास्त मागितले तरी प्रवासी भांडतात, पण ओला टॅक्सीने तर सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हैदराबादमधील रथनीश शेखर या प्रवाशाला फक्त 450 किमी प्रवासासाठी ओला टॅक्सीच्या ड्रायव्हरने एक, दोन नाही तर नऊ लाखाचं बिल दिलं. जितक्या पैशांमध्ये फर्स्ट क्लास विमान प्रवास करत वर्ल्ड टूर करता आली असती, एखादी नवी गाडी विकत घेता आली असती तितकं बिल पाहून शेखरला आपण जागे आहोत की झोपेत हेच सुचेनासं झालं.
24 ऑगस्टला शेखरने सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी जुबली हिल येथून निझामाबादसाठी प्रवास सुरु केला होता. मध्यंतरी दोन तासांसाठी त्याने ब्रेक घेतला आणि त्याच टॅक्सीने परतीचा प्रवास केला. 'अॅपमध्ये मी 450 किमी प्रवास केला असून पाच हजार बिल झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण बेरीज केली असता मी 85 हजार किमी प्रवास केला असून 9 लाख 15 हजार बिल झाल्याचं सांगण्यात आलं,' असं शेखरने सांगितलं.
शेखरने बील भरण्यास नकार दिल्यानंतर ड्रायव्हरने कस्टमर सपोर्टशी संपर्क साधला. त्यांनी तपासणी केली असता बिल 4812 झालं असल्याचं सांगण्यात आलं. 'या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल अर्धा तास लागला. ओलाचा मेलही मला तीन दिवसांनी आला. आमच्याकडून तांत्रिक समस्या असल्याने ही समस्या झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आल्याची', माहिती शेखरने दिली आहे. ओलाने या घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.