ऑनलाइन लोकमत
पल्लहरा, दि. 5 - दाना मांझी यांना आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन न्यावा लागल्याची घटना अजून लोकांच्या स्मरणातून गेली नसताना पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी अशीच घटना ओडिसामध्ये घडली आहे. एका पित्याला आपल्या पोटच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किमी प्रवास करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गती धिबार असं या व्यक्तीचं नाव आहे. अंगुल जिल्ह्यातील पल्लहरा गावातील तो रहिवासी आहे.
ओडिसा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार गती धिबार यांनी रुग्णालयापासून ते गावापर्यंत तब्बल 15 किमी प्रवास पायी केला. यावेळी त्यांच्या खांद्यावर मुलीचा मृतदेह होता. रुग्णालयाकडे मदत मागितली, पण त्यांनी देण्यास नकार दिल्याचा आरोप गती धिबार यांनी केला आहे.
'माझ्या मुलीला ताप आला होता. उपचारासाठी मी तिला रुग्णालयात आणलं होतं. पण रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाने कोणतीच मदत न केल्याने अखेर खांद्यावर नेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता,' असं गती धिबार यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने मात्र आपल्याला अशा कोणत्याही घटनेची माहिती नसल्याचा दावा केला आहे. तसंच रुग्णालयातून मृतदेह वाहून नेण्यासाठी सरकारकडून आम्हाला तरतूदू करण्यासाठी कोणत्याही सूचना आल्या नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
'महाप्रयाण योजनेसंदर्भात आम्हाला सरकारकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. आम्ही हे फक्त वृत्तपत्रात वाचलं आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम्हाला कोणतेही वाहन पुरवण्यात आलेलं नाही. प्रसारमाध्यमांमधूनच मला या घटनेची माहिती मिळत असल्याचं,' उपविभागीय वैद्यकीय अधिकारी पीसी मोहंती यांनी सांगितलं आहे.
दाना मांझी घटनेनंतर सरकारकडून महाप्रयाण योजनेची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिका-यांनी कारवाई करत कनिष्ठ रुग्णालय व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकाचं निलंबन केलं आहे.