ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 10 - एकुलती एक मुलगी असेल तर बऱ्याचदा सासरची मंडळी आपल्या जावयाला घरजावई करून घेतात. पण एखाद्या गावात बहुतांश सगळेच घरजावई असतील तर. हो असे एक गाव आहे जिथे बहुतांश जण हे आपल्या सासरीच घरजावई म्हणून राहतात. या गावाचे नाव आहे सौदापूर.
हरियाणा-चंदिगड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पानिपतजवळ सौदापूर गाव वसलेले आहे. येथील प्रत्येक तिसऱ्या वा चौथ्या घरात घरजावई सापडतोच. जवळपास 600 हून अधिक घरजावई येथे राहतात. आता तर काही घरजावयांचा जावईही सासरला येऊन राहू लागले आहेत. या गावात दोन भाग तर असे आहेत जिथे गावातील स्थानिकांपेक्षा घरजावयांचीच संख्या अधिक आहे.
येथील रहिवासी सुल्तान सिंग सांगतात, आम्ही आमच्या मुलीचे विवाह दूरच्या गावांमध्ये करून देतो. पण आमच्या मुलींना तिथे कसलीही अडचण आली की त्या पती आणि मुलांना घेऊन सरळ माहेरी येतात. जावई मंडळींना जवळच असलेल्या पानीपत शहरात काम मिळते. त्यामुळे हे जावई येथेच वास्तव्यास राहतात.
गावातील घरजावयांबाबत सौदापूरचे माजी सरपंच आझाद सिंग सांगतात, आमच्या गावाची लोकसंख्या सुमारे साडे 12 हजार एवढी आहे. यातील जवळपास निम्मे रहिवासी हे घरजावई आहेत. घरजावई आणि या जावयांचेही जावई गावात राहत असले तरी गावात शांतता आणि एकोपा टिकून आहे.