ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - केरळचे अबकारी आयुक्त ऋषिराज सिंग यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महिलेकडे 14 सेकंदांहून अधिक वेळ पाहिल्यास त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. यासाठी देशात कोणताही कायदा नाही, अशी खंतही ऋषिराज सिंग यांनी व्यक्त केली आहे. कोचीमध्ये चार्टर्ड अकाऊंटच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महिलांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्टही शिकण्याची गरज आहे. ऋषिराज सिंग यांच्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील के. व्ही. धनंजया यांनी टीका केली आहे. सिंग यांचं वक्तव्य कोणताही विचार न करता करण्यात आलं आहे. कारण देशातच नाही तर जगातही असा कोणताच कायदा अस्तित्वात नाही, असं के. व्ही. धनंजया यांनी सांगितलं आहे. महिलांना असुरक्षित वाटणं ही खूपच गंभीर गोष्ट आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.
सिंग यांचं हे वक्तव्य केरळमध्ये अक्षरशः वा-यासारखं पसरलं आहे. केरळ सरकारनंही सिंग यांचं वक्तव्य अत्यंत गांभीर्यानं घेतलं आहे. केरळचे क्रीडा मंत्री जयाराजन यांनी सिंग यांचं हे वक्तव्य त्रासदायक असून, त्यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल, असं म्हटलं आहे. एखादी बेजबाबदार व्यक्तीच अशा प्रकारचं वक्तव्य करू शकते, असंही जयाराजन म्हणाले आहेत.