- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - विमानात प्रवास करताना आता एअरप्लेन मोडवर जाण्याची गरज राहणार नाही. लवकरच विमानांमध्ये इंटरनेट वापराची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब फक्त बॅगेत किंवा खिशात न ठेवता त्यांचा वापर करणं शक्य होणार आहे. नागरी उड्डाण विभागाचे सचिव आर एन चौबे यांनी विमानांमध्ये वायफाय सुरु करण्यासंबंधी येत्या 10 दिवसांत निर्णय होईल अशी माहिती दिली आहे.
'संबंधित सरकारी विभागांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच चांगली बातमी मिळेल. वाय-फाय सेवेसाठी किती शुल्क आकारायचं याचा निर्णय विमान कंपन्यांवर सोडण्यात येईल, सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही', असं आर एन चौबे म्हणाले आहेत. सध्या भारतीय हवाई क्षेत्रात उड्डाणादरम्यान मोबाईल आणि इंटरनेट वापराची सुविधा नाही आहे.
टेलिकॉम, गृह आणि नागरी उड्डाण विभागातील मंत्र्यांनी यासंबंधी सविस्तर चर्चा केली, यावेळी सुरक्षेला कोणाताही धोका नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. विमान कंपन्यांनी ही सेवा देण्याचा निर्णय घेतला तर प्रवासी व्हाट्सअॅप कॉलही करु शकतील. सद्यस्थितीला भारतात कोणतीही विमान कंपनी वाय-फाय सेवा देत नाही आहे.