धोरणविषयक दस्तऐवजांची चोरी : सात आरोपींना केली अटकनवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकण्याच्या हेरगिरीच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणाच्या तपासला वेग आला आहे़ शुक्रवारी याप्रकरणी आणखी दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली़ आता अटक करण्यात आलेल्यांची संख्या सातवर पोहोचली आहे़एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी प्रयास जैन आणि शांतनू सैकिया या दोघांना अटक करण्यात आली़ हे दोघेही ऊर्जा क्षेत्रातील कन्सल्टन्ट आहेत़ तेल मंत्रालयातून चोरी झालेली कागदपत्रे यांना विकल्या गेली होती़ यापैकी सैकिया माजी पत्रकार आहे़ तो पेट्रोलियम मुद्यावर एक वेब पोर्टल चालवतो़ डिफेन्स कॉलनीत त्याचे कार्यालय आहे़ तर प्रयास जैनची स्वत:ची कन्सल्टन्सी आहे़ गुरुवारी पोलिसांनी आशाराम आणि ईश्वर या तेल मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह तीन दलालांना अटक केली होती़ अधिकृत कागदपत्रांच्या चोरीबाबत काही महिन्यांपूर्वी तेल मंत्रालयास सतर्क करण्यात आले होते़ एकेदिवशी संयुक्त सचिव(खनन) गिरीधर अरमाने यांच्याकडील काही कागदपत्रे झेरॉक्स मशीनवर आढळली होती़ दोन महिन्यांपूर्वी संचालक प्रशांत लोखंडे यांच्या कक्षाचा दरवाजा संशयास्पद स्थितीत उघडा आढळला होता़ यानंतर मंत्रालयाने संपूर्ण चौकशीचे आदेश देत मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते़ मात्र आशाराम हा सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायचा़ यानंतर त्याचा मुलगा राकेश कुमार आणि भाऊ लालता प्रसाद दोघेही बनावट पासच्या आधारे तेल मंत्रालयात शिरायचे़ बनावट चाव्यांच्या मदतीने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये उघडल्यानंतर ते त्यातील गोपनीय कागदपत्रे बाहेर नेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क) सातही आरोपींना शुक्रवारी येथे न्यायालयात हजर केले़ लालता प्रसाद, राकेश कुमार, प्रयास जैन व शांतनू सैकिया यांना २३ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ तर ईश्वर सिंग, आशाराम व राजकुमार यांची दोन आठवड्यांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़आशारामने निर्दोष असल्याचा दावा करीत मुलावर दोषारोपण केले़ मी या प्रकरणात निर्दोष आहे़ याबाबत १७ फेबु्रवारीला माहिती मिळाली़ मी काहीही केलेले नाही, असे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले़
तेल हेरगिरी तपासास वेग
By admin | Published: February 21, 2015 3:45 AM