‘ओखी’ चक्रिवादळाचे दक्षिणेत १६ बळी; २00 मच्छीमार, २५० बोटी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:13 AM2017-12-02T02:13:48+5:302017-12-02T02:14:13+5:30
मुसळधार पाऊस व जोरदार वा-यांसोबत धडकलेल्या ‘ओखी’ चक्रिवादळाच्या तडाख्यात तामिळनाडू व केरळात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तिरुअनंतपुरम/चेन्नई : मुसळधार पाऊस व जोरदार वा-यांसोबत धडकलेल्या ‘ओखी’ चक्रिवादळाच्या तडाख्यात तामिळनाडू व केरळात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात २५० बोटी बेपत्ता झाल्या असून, ८० मच्छीमारांना परत आणण्यासाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे, तर ६० हून अधिक मच्छीमारांना परत आणण्यात यश आले आहे.
मात्र, गुरुवारी मासेमारीसाठी निघालेले २०० मच्छीमार अद्याप घरी परतले नाहीत, असे सांगण्यात येते. या चक्रिवादळाने आतापर्यंत १६ जणांचा बळी घेतला. केरळ, तामिळनाडूच्या किनाºयांवरील भागांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मच्छीमारांच्या शोधासाठी नौदलाने पाणबुड्यांसोबत हेलिकॉप्टर व डॉर्नियर विमाने तैनात केले आहेत. वादळात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाचे सहकार्य मागितले होते. ‘ओखी’ वादळाची लक्षद्वीप बेटाकडे आगेकूच पाहता, मदत साहित्यासह दोन जहाजे सज्ज ठेवण्यात आली आहेत.