बंगळुरु, दि. 5 - क्षुल्लक कारणावरुन ओला कॅब ड्रायव्हरने प्रवाशाला रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅबमधील एसीला न विचारता हात लावल्याने हा वाद सुरु झाला होता, ज्याचं रुपांतर भांडणात झालं. संतापलेल्या कॅब चालकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपी चालक सय्यद अरिफविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
33 वर्षीय जी केशव रेड्डी व्यवसायिक असून मुळचे हैदराबादचे आहेत. आपल्या दोन मित्रांसोबत ते ओला कॅबने प्रवास करत असताना ही घटना घडली.
जी केशव रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट मार्क्स रोडपासून ते यशवंतपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी त्यांनी ओला कॅब बूक केली होती. प्रवासात त्यांच्या एका मित्राने एसी कमी करण्याची विनंती ड्रायव्हरकडे केली. पण ड्रायव्हर आरिफ फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याने त्याला ती विनंती ऐकू गेली नाही. म्हणून मग रेड्डी यांनी स्वत: एसी कमी करण्यासाठी हात पुढे केला. यावेळी ड्रायव्हर संतापला आणि त्याने हातावर फटका मारत हात मागे घेण्यास सांगितलं.
यानंतर ड्रायव्हरसोबत वादावादी सुरु झाली असता त्याने तेलगू भाषिकांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलण्यास सुरुवात केली असा दावा रेड्डी यांनी केला आहे. वाद वाढत चालला असल्याने रेड्डी आणि त्यांच्या मित्रांनी कॅब सोडून दुस-या वाहनाने जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर परिस्थिती अजून चिघळली. आरिफने गाडीतून लोखंडी रॉड काढला आणि मारहाण करण्यासाठी पुढे सरसावला.
रेड्डी यांचे मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले, पण रेड्डी यांचा तोल गेल्यान ते खाली पडले. ड्रायव्हरने त्यांना रॉडने मारहाण करत जखमी केलं. जखमी असवस्थेत रेड्डी यांना मित्रांनी रिक्षाने रुग्णालयात नेलं. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रेड्डी यांनी सदाशिवनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी ड्रायव्हर आरिफने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.