नवी दिल्ली : स्वीडनच्या बोफोर्स कंपनीकडून १९८७ साली ४१0 तोफांच्या खरेदीनंतर सैन्यदलाच्या तैनातीत २0१६ पर्यंत एकही नवी तोफ दाखल झालेली नाही. २५ वर्षापूर्वी खरेदी केलेल्या बोफोर्स तोफा आता जुन्या झाल्या आहेत. तथापि उत्तम देखभालीमुळे ४१0 पैकी २00 बोफोर्स तोफा आजही चांगल्याप्रकारे सक्रिय आहेत. सैन्यदलाची सारी मदार तूर्त या तोफांवरच असली तरी सैन्यदलप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी याविषयी वाटणारी चिंता संरक्षण मंत्रालयाला कळवली आहे.संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोफोर्स तोफांची जागा घेण्यासाठी भारतात ‘धनुष’ नामक तोफांची उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे. विभिन्न प्रकारच्या हवामानात दोन हजारांपेक्षा अधिक तोफगोळे सोडून ‘धनुष’चे प्राथमिक परीक्षणही सफल ठरले आहे. सैन्यदलाला एकूण ४१४ धनुष तोफा हव्या आहेत. संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी)ने त्यापैकी किमान ११४ धनुष तोफा शक्य तितक्या लवकर सैन्यदलाच्या तैनातीत दाखल करण्याचे आदेशही जारी केले आहेत. तथापि डीआरडीओ, आॅर्डिनन्स फॅक्टरी डेपो व भारत फोर्जच्या सूत्रांनुसार ११४ धनुष तोफांचा पहिला हप्ता सैन्यदलाच्या ताब्यात २0२0 अगोदर मिळणे शक्य नाही. उत्पादन प्रक्रियेचा वेग वाढवावा आणि तोफा लवकरात लवकर ताब्यात मिळाव्यात, यासाठी सैन्यदलातले उच्चपदस्थ अधिकारी मात्र बरेच आग्रही आहेत. (विशेष प्रतिनिधी)
जुन्या बोफोर्स तोफांवरच तूर्त मदार
By admin | Published: January 19, 2016 3:04 AM