नवी दिल्ली - देशातील काही भागांमध्ये रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे. रिपोर्टनुसार, दर 3.14 सेकंदाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो. याच दरम्यान एका वृद्ध दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. हजारो लोकांचा जीव वाचावा म्हणून हे दाम्पत्य स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवत आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते हे मोठं काम करत आहेत. विशेष म्हणजे ते यासाठी आपल्या पेन्शनच्या पैशांचा वापर करत आहेत. हैदराबाद येथे राहणाऱ्या या दाम्पत्याच्या पुढाकाराला सर्वांनीच कडक सॅल्यूट केला आहे. 73 वर्षीय गंगाधर टिळक कटनम (Gangadhar Tilak Katnam) हे 'रोड डॉक्टर' म्हणून अत्यंत लोकप्रिय आहेत.
कटनम आपली पत्नी व्यंकटेश्वरी कटनम यांच्यासमवेत कारने फिरतात आणि ज्याठिकाणी रस्त्यावर एखादा खड्डा दिसतो, तो खड्डा ते भरून टाकतात. आपल्या कारला ते खड्डे भरणारी गाडी असं म्हणतात. गंगाधर टिळक कटनम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "खड्ड्यांमुळे रस्त्यावर होणारे अनेक अपघात पाहिले. त्यामुळे मी या विषयावर गांभीर्याने काहीतरी करण्याचा निर्णय घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर मी रस्त्यावरील हे खड्डे स्वत: भरण्याचा निर्णय घेतला आहे."
कोण आहेत गंगाधर टिळक कटनम?
गंगाधर टिळक कटनम यांनी जवळपास 35 वर्षे भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून काम केले. निवृत्तीनंतर कटनम हे एका सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेयर डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करण्यासाठी हैदराबादला गेले. तेव्हापासून ते शहरातील खड्डे भरण्याचे काम करत आहेत. रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनिअर म्हणून असलेली नोकरी एका वर्षाच्या आत सोडली आणि त्यानंतर ते शहरातील खड्डे भरण्यासाठी पूर्णपणे काम करत आहे. या कामात त्यांची पत्नी देखील त्यांना उत्तम साथ देत आहे.
2,030 खड्ड्यांसाठी केला 40 लाखांचा खर्च
रस्त्यांच्या दुरुस्तीच्या खर्चाबाबत विचारले असता गंगाधर यांनी मला मिळणाऱ्या पेन्शनमधून मी यासाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्था करत आहे. खड्डे भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री माझ्या पेन्शनच्या पैशातून खरेदी केली आहे. गेल्या 11 वर्षांपासून त्यांनी शहरातील सुमारे 2,030 खड्डे भरण्याचे काम केले असून त्यासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यांचं हे काम पाहून अनेक अधिकारी देखील त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आपलं काम वाढविण्याच्या उद्देशाने कटनम 'श्रमधन' नावाची संस्था सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.