जुने गोवा जमीन हडप प्रकरण हा घोटाळाच
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
-प्राथमिक चौकशीत गैरप्रकार उघडकीस
-प्राथमिक चौकशीत गैरप्रकार उघडकीस-मडकईकरांविरुद्ध एफआयआर शक्यपणजी : पोलीस स्थानकासाठी संपादन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली जमीन बळकावण्याच्या प्रकरणात तथ्य असल्याचे भ्रष्टाचारविरोधी खात्याच्या प्राथमिक चौकशीतून आढळून आले आहे. या प्रकरणात आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या विरोधात एफआयआर नोंदविणेही शक्य आहे. या प्रकरणात प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून, यात अनेक गैरप्रकार आढळून आल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली. या प्रकरणात घोटाळा झाल्याचे दर्शविणारे काही पुरावेही एसीबीच्या हाती लागले आहेत. प्राथमिक चौकशीत काही महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस आल्यामुळे या प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जुने गोवे परिसरात ऑगस्ट २००४ साली पोलीस स्थानक बांधण्यासाठी मडकईकर यांनी ५ हजार चौरस मीटर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिला होता. ती जमीन अनंत शेणवी धुमे या नागरिकाची होती. हा प्रस्ताव सात दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला होता. तीच जमीन आता १/१४च्या उतार्यात मडकईकर रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असल्याचे दाखविण्यात येत आहे. हा जमीन संपादन करण्याची धमकी देऊन ती विकायला भाग पाडण्याचा प्रकार होऊ शकतो, असे सांगून पर्रीकर यांनी तेव्हा हे प्रकरण भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गृह खात्याकडून या प्रकरणात चौकशी करण्याची सूचना करणारे पत्र पाठविले होते. प्राथमिक चौकशी करून या प्रकरणात तथ्य आढळल्यास एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले होते. एसीबीने ४ महिन्यांत या प्रकरणातील प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे.