Pm Modi, Old Man, Help: दिल्लीतील एका वृद्ध व्यक्तीने मुलगा आणि सुनेच्या छळाला कंटाळून थेट पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे. बुद्धिराम हे ७३ वर्षीय वृद्ध दिल्लीत पत्नीसह राहतात. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असूनही मुलगा घर सोडत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल आणि पोलिस आयुक्त यांनाही चिठ्ठी पाठवली आहे. मुलगा आणि सूनेकडून त्यांचा प्रचंड छळ होत आहे. घर सोडून जा सांगितल्यावर मुलगा आणि सून जीवे मारण्याची धमकी देतात, असं त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
वकिलामार्फत पाठवली चिठ्ठी
७३ वर्षीय बुद्धिराम हे ६५ वर्षीय पत्नी सावित्री यांच्यासोबत हर्ष विहारच्या गल्ली क्रमांक ९ येथे राहतात. वयोमानामुळे त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतोय. त्यांनी वकील मनिष भदौरिया यांच्यामार्फत पंतप्रधान, एलजी आणि इतरांना चिठ्ठी पाठवली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले, '१० एप्रिल रोजी शाहदराच्या जिल्हाध्यक्षांनी माझा मुलगा संजय कुमार आणि सून सुमन यांना आमचं घर सोडण्याचं आदेश दिला होता. मात्र त्यांनी आदेशाचं पालन केलेलं नाही. डीएमने ९ जून रोजी हर्ष विहार पोलिस ठाण्याच्या एसएचओला निर्देश देत घर रिकामं करण्यास सांगितलं. सोबतच पोलिस बळही पुरवलं. मात्र तरीही काहीच सुधारणा झाली नाही. १५ जून रोजी मी पोलिसांना अर्ज दिला आणि जिल्हाध्यक्षांच्या आदेशाची आठवण करुन दिली. यानंतर एक पोलिस घरी आला.मात्र पोलिसांनी मुलगा आणि सूनेला ५ दिवसांचा दिलासा दिला. पाच दिवसांनंतरही ते गेलेच नाहीत. हतबल होऊन शेवटी मी ५ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मुलगा आणि सुनेने लोकांसमोर नाटक केलं आणि नंतर लोक आम्हालाच समजवायला लागले.'
बुद्धिराम यांनी आरोपात म्हटलं आहे की, 'माझा मुलगा आणि सून मला जीवे मारण्याची आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देतात. पोलिस यामध्ये योग्य पद्धतीने कारवाई करत नाहीएत. मुलगा आणि सून घरी गुंडांना बोलावून धमकी देतात. मी पंतप्रधानांना विनंती करतो की आम्हाला मुलगा आणि सूनेच्या छळातून मुक्त करा.'