कानपूर: नोटबंदीच्या 14 महिन्यांनंतरही जुन्या नोटा सापडण्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीये. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा पकडण्यात आल्या आहेत. येथे तब्बल 80 ते 100 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. नोटा मोजण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे, या नोटा गाद्यांमध्ये लपवून ठेवल्या होत्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात आनंद खत्री नावाचा मुख्य आरोपी आहे. टक्केवारीवर नफा घेवून तो नोटा बदलून द्यायचा. पोलीस आणि एनआयएच्या पथकाने मंगळवारी 3 ते 4 हॉटेल्स आणि बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरात छापेमारी केली. यावेळी स्वरूप नगर परिसरातील एका बंद घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सापडल्या. घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन गाद्यांमध्ये लपवण्यात आलेल्या 500 - 1000 च्या जुन्या नोटा पाहून पोलिसही अवाक झाले. या प्रकरणी 16 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामागे जुन्या नोटा बदलून देणारं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाचं कनेक्शन दहशतवादी संघटनाशी जोडण्यास पोलिसांनी नकार दिला. आरोपी आनंद खत्री श्रीमंत घरातील आहे. तो 20 ते 25 टक्के नफा घेऊन तो या नोटा बदलून देतो असं लोकांना सांगायचा. पण त्याला ज्या ठिकाणाहून नोटा बदलवायच्या होत्या त्यामध्ये अपयश आल्याने घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा जमा होत गेल्या. कानपूर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ -