नवी दिल्ली: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजपासून नवीन संसद भवनात अधिवेशनाचं कामकाज सुरू होणार आहे. नव्या संसदेत जाण्यापूर्वी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या ७९५ खासदारांचे एकत्र फोटोशूट झाले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य एकत्र फोटोशूटसाठी उपस्थित होते.
संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना जुन्या संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये संबोधित केले. या इमारतीमधील सेंट्रल हॉल देखील आपल्याला भावनिक करते आणि आपल्या कर्तव्यासाठी प्रेरणाही देते. १९५२ नंतर, या सेंट्रल हॉलमध्ये जगातील सुमारे ४१ राष्ट्रप्रमुखांनी आपल्या सर्व सन्माननीय खासदारांना संबोधित केले आहे. आपल्या सर्व राष्ट्रपतींनी येथे ८६ वेळा भाषणे दिली आहेत, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, माझी विनंती आणि सूचना आहे, जेव्हा आपण आपण आता नवीन संसद इमारतीत जात आहोत, मात्र याचवेळी जुन्या संसद भवनाची प्रतिष्ठा कधीही कमी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. तसेच नुसते त्याला 'जुने संसद भवन' म्हणत सोडून द्यायचे असे नाही. आपण सर्व सहमत असाल तर भविष्यात ते 'संविधान सदन' म्हणून ओळखले जावे, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. नरेंद्र मोदींच्या या विधानावर उपस्थित सर्व खासदारांनी प्रतिसाद दिला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन केली. नवीन संसद भवनात नव्या भविष्याचा श्री गणेश आम्ही साकारणार आहोत, असे ते म्हणाले. आज, विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केल्यानंतर, आम्ही पुन्हा एकदा दृढनिश्चय करत आहोत आणि ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने नवीन इमारतीकडे वाटचाल करत आहोत. एकप्रकारे ही इमारत आणि हे मध्यवर्ती सभागृह आपल्या भावनांनी भरलेले आहे. हे आपल्याला भावनिक बनवते आणि आपल्या कर्तव्यासाठी प्रेरित करते. स्वातंत्र्यापूर्वी हा विभाग एक प्रकारची लायब्ररी म्हणून वापरला जात होता. नंतर येथे संविधान सभेची बैठक सुरू झाली, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.