"नशीब, पाण्यावर दंडात्मक कारवाई नाही केली!’’, दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 07:28 PM2024-08-02T19:28:58+5:302024-08-02T19:29:15+5:30
Old Rajendra Nagar Basement Case: दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर येथे एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरून दिल्ली हायकोर्टाने आज पोलिसांना चांगलेच फटकारले.
दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर येथे एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरून दिल्ली हायकोर्टाने आज पोलिसांना चांगलेच फटकारले. तसेच आतापर्यंत या प्रकरणाच्या झालेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘’नशीब, पाण्यावर दंडात्मक कारवाई नाही केली!’’ असं विधान यावेळी कोर्टानं केलं.
काळजीवाहू मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर राजेंद्रनगरमधील एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये झालेल्या दुर्घटनेत ३ विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूबाबत उच्चस्तरीच चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी सुनावणीदरम्यान, कोर्टाने तपासाच्या पद्धतीवरून पोलिसांना फैलावर घेत खडेबोल सुनावले. यावेळी न्यायमूर्तींनी दिल्ली पोलिसांच्या वकिलाला सांगितले की, नशीब म्हणजे तुम्ही बेसमेंटमध्ये घुसल्याने पावसाच्या पाण्यावर दंडात्मक कारवाई केलेली नाही. दरम्यान, कोर्टाने या घटनेचा तपास सीबीआयकडे सुपूर्द केला आहे.
राजेंद्रनगर येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी पावसाच्या पाण्यामधून वेगाने कार चालवून दुर्घटनेस कारण ठरल्याचा ठपका ठेवून एका कारचालकाला अटक केली होती. त्याचा उल्लेख करत कोर्टाने वरील विधान केले. या कारचालकाने वेगाने कार चालवल्याने पाण्याचा दबाव वाढून गेट फुटले आणि बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले, असा आरोप रपोलिसांनी केला होता. दरम्यान, पोलिसांनी ठेवलेला सदोष मनुष्यवधाचा आरोप मागे घेतल्यानंतर ड्रायव्हर मनुज कथुरिया याला गुरुवारी जामीन मिळाला होता.