नवी दिल्ली - देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. रावत यांच्या निधनामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता नव्या सीडीएसची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र नव्या सीडीएसची नियुक्ती होईपर्यंत देशामध्ये जुनी व्यवस्था अस्थायीपणे लागू करण्यात आली आहे. त्यानुसार लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांना चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन नियुक्त करण्यात आले आहे.
देशात सीडीएसची व्यवस्था नव्हती तेव्हा देशामध्ये चीफ ऑफ डिफेन्स कमिटी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वयाचे काम करत होती. या समितीमध्ये तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांचा समावेश आहे. कारण जनरल एमएम नरवणे सर्वात ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना या समितीचे प्रमुख नियुक्त करण्यात आले आहे. तसेच देशाचे नवे सीडीएस म्हणूनसुद्धा जनरल नरवणे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत नव्या सीडीएसची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हीच व्यवस्था कायम राहणार आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीडीएसच्या अनुपस्थितीमध्ये ज्येष्ठ प्रमुख हे चीफ ऑफ स्टाफ समितीचे चेअरमनपद सांभाळतात. चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ जे आतापर्यंत सीडीएस यांना रिपोर्ट करायचे ते आता जनरल एमएम नरवणे यांना रिपोर्ट करतील.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्सचेसुद्धा प्रमुख असतात. तसेच चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात. डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्समध्ये जे दुसरे सर्वात ज्येष्ठ अधिकारी हे अॅडिशनल सेक्रेटरी असतात. या डिपार्टमेंटमध्ये अॅडिशनल सेक्रेटरी थ्री-स्टार मिलिट्री ऑफिसर असतात. आता हे पद लेफ्टिनंट जनरल अनिल पुरी यांच्याकडे आहे.