मुंबई : आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संग्रहातले दुर्मीळ कार्यक्रम लवकरच मोबाइलवर उपलब्ध होणार आहेत़ त्यासाठी मोबाइलचे विशेष अॅप्लिकेशन तयार केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. आकाशवाणीत चार लाख तासांचे ध्वनिमुद्रण तर दूरदर्शनमध्ये तीन लाख तासांचे ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. या सगळ्या कार्यक्रमांचा लोकांना आनंद घेता यावा, यासाठी ते मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील, असे जावडेकर म्हणाले. जुन्या जमान्यात ध्वनिमुद्रणाचे आद्य साधन असलेले फोनोग्राम सिलिंडर याची माहिती देणाऱ्या अमर शर्मा आणि अनुकृती शर्मा लिखित ‘द वंडर दॅड वॉज सिलिंडर’ या पुस्तकाचे प्रकाशन जावडेकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.भारतात पुराण वस्तुसंग्रहालयात ध्वनिमुद्रणाचा इतिहास सांगणारी कागदपत्रे नाहीत. सामान्यपणे वर्ष १९०२ मध्ये डिस्क अर्थात रेकॉर्ड केलेल्या काळ्या तबकड्यांचा शोध लागल्यावर ते भारतातील शास्त्रीय व चित्रपट संगीताचे मुद्रण सुरू झाले, असे आतापर्यंत मानले जात होते. पण शर्मा यांना १८९९ साली मुद्रण झालेले मेणाचे सिलिंडर्स सापडले आहेत. भारतीय संगीत, नाटक व फिल्म यांच्या ध्वनिमुद्रणाच्या लक्षणीय इतिहासाची माहिती शर्मा यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे. १९८० च्या दशकात कोलकाता येथील भंगारवाल्याच्या दुकानात मला हा खजिना सापडला व तेथून ध्वनिमुद्रणाच्या इतिहासाचा शोध घेणे सुरू झाले. भारताच्या ध्वनिमुद्रणाचा इतिहास सांगणारा हा खजिना कोलकाताच्या रस्त्यावर पडला होता, असे शर्मा यांनी सांगितले. ते सीमाशुल्क व उत्पादन शुल्क विभागात आयुक्त असून, संगीताच्या इतिहासातील तज्ज्ञ आहेत. (प्रतिनिधी)
जुने कार्यक्रम आता मोबाइल अॅपवर
By admin | Published: September 08, 2014 3:11 AM