नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,12,62,707 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17,921 नवे रुग्ण आढळून आले असून 133 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,58,063 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाली असली तरी अनेकांच्या मनात याबाबत शंका आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली. मोदींनी एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर अनेकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
बंगळुरूच्या 103 वर्षीय कामेश्वरी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोनाची लस घेणाऱ्या त्या देशातील सर्वात वयस्कर महिला ठरल्या आहेत. कर्नाटकमध्ये राहणाऱ्या कामेश्वरी (J.Kameshwari) यांनी बन्नेरघट्टा रोड येथील अपोलो रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिलनाडू, गुजरात आणि कर्नाटकमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
पंतप्रधान मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू, असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला. मोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण
मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे मोदींनी घेतलेली कोरोना लस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे.