नवी दिल्ली - पैलवान सागर राणा हत्या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 4 मेरोजी पैलवान सागरची हत्या झाली होती. तपासातून समोर आले आहे, की त्या दिवशी छत्रसाल स्टेडियमवर काही लोकांनी सुशील कुमारचा अपमान केला होता आणि याचाच बदला घेण्यासाठी त्याने हरियाणाहून गुंड बोलावले होते. रात्री या गुंडांनी केलेल्या मारहाणीत सागरचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. पोलिसांनी या व्हिडिओबाबत न्यायालयात माहिती दिली.
पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी सागर, सोनू आणि इतर लोकांना जनावराप्रमाणे मारहाण केली होती. एवढेच नाही, तर सोनूला मुत्र पाजण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. याच मारहाणीत सागर राणाचा मृत्यू झाला आहे. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, सागर पैलवानास लाठ्या-काठ्यांनी मारहाण होत असल्याचे दिसून येते. व्हिडिओत सुशील कुमारच्या हातात हॉकी स्टीक असल्याचं दिसून येतंय. तर, खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पैलवान सागर दिसून येतोय.
पोलिसांनी गेल्या आठवड्यात याप्रकरणी न्यायालयात माहिती देताना व्हिडिओसंदर्भात भाष्य केले. सुशीलने आपल्या मित्रांना सांगून या मारहाणीचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या माध्यमातून कुस्ती क्षेत्रात आपली दहशत निर्माण करण्याचा सुशील कुमारचा डाव होता. त्यासाठी, हा व्हिडिओ पैलवानांसह इतर मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करण्यात येणार होता. याप्रकरणी सुशील कुमारचे नाव येताच, नागरिकांना संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
कॉलर पकडल्यानें सुशील रागाने लालबुंद
4 मेरोजी कुख्यात गँगस्टर काला जठेडीचे भाऊ सोनू, रविंद्र आणि इतरांचा मॉडेल टाऊनच्या फ्लॅटवरून पैलवान सुशील कुमार सोबत वाद झाला होता. त्या लोकांनी सुशीलची कॉलरही पकडली होती. एवढेच नाही, तर त्याला पाहून घेऊ, असे म्हणत पळवूनही लावले होते. या अपमानामुळे सुशील रागाने लालबुंद झाला होता. खुन्नस आणि तणावात आल्याने त्याने त्याच दिवशी बदला घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने कुख्यात नीरज बवाना आणि असौदा गिरोहच्या गुंडांची मदत घेतली.
नेमकं घटनाक्रम काय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मेरोजी दिवसा सुशील कुमार छत्रसाल स्टेडियमवर आला होता, तेव्हा त्याच्यासोबत फार पैलवान नव्हते. स्टेडियमवर अचानकच त्याचा सोनू, सागर, अमित, भक्तू, रविन्द्र आणि विकास यांच्याशी शाब्दिक वाद झाला. येथे सुशीलचा जबरदस्त अपमानही केला गाले. त्यावेळी सुशील स्टेडियमवरून निघून गेला, मात्र, अपमानाचा बदला घेण्याचे त्याने ठरवले. अजय आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने गुंडांना फोन करून हरियाणाहून दिल्लीला बोलावून घेतले. सर्वप्रथम कुण्या एकाठिकाणी हे सर्व जण जमले. काहींनी तेथे दारू घेतली आणि जेवणही केले.
काठ्या-हॉकी स्टीकने मारहाण
5-6 कारने हे लोक रात्री 12 वाजताच्या सुमारास शालीमार बाग येथे रविंद्रच्या घरी पोहोचले. त्यावेळी रविंद्र आपल्या घराखाली असलेल्या एका दुकानासमोर आइस्क्रिम खात होता. रविंद्र आणि त्याचा साथीदार विकासला हे गुंड आपल्या कारमध्ये बसवून घेऊन गेले. यानंतर सर्वच मॉडेल टाउन येथील सोनूच्या फ्लॅटजवळ पोहोचले. तेथून सोनू, सागर, अमित आणि भक्तू यांना कारमध्ये बसवून सर्वांना रात्री साधारणपणे 1 वाजता छत्रसाल स्टेडियमवर नेले गेले. यानंतर येथील पार्किंग भागात या सर्व सहा पैलवानांना सुशील आणि त्याच्या गुंडांनी काठ्या, दांडे, हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.