नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदी अखेर ओम बिर्ला यांच्या नावावर सहमती बनली आहे. ओम बिर्ला हे पुन्हा एकदा लोकसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहेत. सत्ताधारी पक्षाकडून राजनाथ सिंह यांनी मोर्चा सांभाळला. त्यात विरोधकांशी चर्चा करून उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकसभेची परंपरा कायम राहणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत सत्ताधारी आणि विरोधक यांनी एक एक पाऊल पुढे येत एकमत झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात लोकसभेचे अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले जाण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं पुढे येत आहे. २०१४ आणि २०१९ या काळात भाजपानं स्वबळावर बहुमत मिळवलं होतं. विरोधकांच्या संख्याबळामुळे लोकसभेचे उपाध्यक्षपद मागील १० वर्ष रिक्त होते. १६ व्या आणि १७ व्या लोकसभेत कुठल्याही पक्षाकडे उपाध्यक्ष नव्हते. त्यामुळे सरकारवर कायम टीका होत राहिली. २०१४ ते २०१९ पर्यंत सुमित्रा महाजन, २०१९ ते २०२४ या काळात ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष होते.
कोण आहेत ओम बिर्ला?
एनडीएकडून १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांचं नाव आघाडीवर आहे. ओम बिर्ला हे १७ व्या लोकसभेचेही अध्यक्ष होते. ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रल्हाद गुंजन यांना ४१ हजार ९७४ मतांनी हरवले. आरएसएसचा गड मानला जाणाऱ्या कोटामधून ओम बिर्ला निवडून आले आहेत. ते सलग तिसऱ्यांदा कोटा मतदारसंघात जिंकले आहेत.
राहुल गांधी काय म्हणाले?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी अध्यक्षपदासाठी विरोधकांनी पाठिंबा द्यावा असं मत व्यक्त केले. आम्ही अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ परंतु तुम्ही उपाध्यक्षपद विरोधकांना द्या असं राजनाथ सिंह यांना सांगण्यात आले. त्यावर मी पुन्हा फोन करतो असं राजनाथ सिंह म्हणाले. अद्याप कॉल आला नाही. पंतप्रधान मोदी सांगतात, सहकार्य करा, पण आमच्या नेत्यांचा अपमान केला जातोय. सरकारचा हेतू स्वच्छ नाही असा आरोप राहुल गांधींनी केला.