नोटबंदीचा उल्लेख करताच ओम बिर्लांचा हस्तक्षेप; म्हणाले, २०१६ निघून गेले, अर्थसंकल्पावर बोला...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 07:30 AM2024-07-25T07:30:06+5:302024-07-25T07:30:06+5:30
अर्थसंकल्पीय तरतुदीवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांचे प्रहार; केंद्र सरकारने मोठी संधी घालविल्याची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सदनांत बुधवारी अर्थसंकल्पीय तरतुदींवरील चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर प्रहार करण्याची संधी सोडली नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांवर लक्ष केंद्रित केले असून, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या इतर राज्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला, तर सत्ताधारी आघाडीतील सदस्यांनी सरकारची बाजू लावून धरली.
केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत सर्वसाधारण चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा यांनी 'खुर्ची वाचवा आणि मित्रांवर खर्च करा' हा या सरकारचा शेवटचा नारा असल्याचा दावा केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज भलेही आनंदी असतील, पण बदल व्हायला फारसा वेळ लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
बेरोजगारी, महागाईकडे दुर्लक्ष: थरूर
सरकारला अर्थव्यवस्थेची गाडी सुधारता आली नाही, त्यांनी फक्त हॉर्नचा आवाज वाढवला, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली. बेरोजगारी, महागाई, आरोग्य क्षेत्र आणि शिक्षण याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा दावाही त्यांनी केला. सरकारने अर्थसंकल्पाच्या रूपाने आलेली मोठी संधी गमावली आहे. सरकारने पुन्हा एकदा भारतातील जनतेची निराशा केली आहे, असे ते म्हणाले.
बिहारवर आक्षेप घेऊ नये : यादव
जनता दल (युनायटेड) खासदार दिनेश चंद्र यादव यांनी बुधवारी विरोधी पक्षांवर निशाणा साधत बिहारला अर्थसंकल्पात मदत मिळाली असेल, तर त्यावर कोणीही आक्षेप घेऊ नये.
जनता धडा शिकवेल : चिदंबरम
राज्यसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला वाढत्या महागाई आणि बेरोजगारीवर नियंत्रण न ठेवल्यास देशातील जनता नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाला दिली तशी शिक्षा देत राहील, असा इशारा दिला.
मराठा, धनगर आरक्षणात सरकारकडून तणाव वाढविण्याचे काम
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून लोक रस्त्यावर उत्तरले आहेत. सरकारकडून यात हस्तक्षेप करणे आवश्यक होते. परंतु, सरकार तणाव वाढविण्याचे काम करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्रात मराठा, धनगर आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करीत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. सरकारकडून यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. सरकारने या दोन्ही आरक्षणावर बोलणे आवश्यक आहे. सरकारने या प्रश्नावर तत्काळ बैठक घ्यावी आणि प्रश्न मार्गी लावावा, सरकारने महिला आरक्षण कायदा मंजूर केला. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. देशात जातनिहाय जनगणना करा. त्याशिवाय आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या.
प. बंगालने केंद्राच्या योजना राबविल्या नाहीत...
सीतारामन यांनी तृणमूलने (टीएमसी) राज्यावर अन्याय झाल्याच्या आरोपाचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अनेक योजनांची गेल्या १० वर्षात राज्यात अंमलबजावणी झाली नाही. असे त्या म्हणाल्या, त्यावर टीएमसी सदस्यांनी आक्षेप घेत केंद्राकडे पश्चिम बंगालचे १ लाख कोटी रुपये येणे बाकी आहे. असे सांगितले.
खासगी क्षेत्रातील ३५ तज्ज्ञांची केंद्रीय खात्यांत नियुक्ती : २०१८ सालापासून केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये खासगी क्षेत्रातील ३५ तज्ज्ञांची लॅटरल एन्ट्री मोड वा तत्वानुसार नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी दिली. लॅटरल एन्ट्री मोड पद्धतीने केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये ६३ जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.
संसद परिसरात सोनिया गांधी, जया बच्चन यांचे स्मितहास्य
संसद परिसरात इंडिया आघाडीच्या निदर्शनावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि समाजवादी पार्टीच्या जया बच्चन समोरासमोर आल्या, तेव्हा त्यांनी स्मितहास्य करत विचारपूस केली. नंतर काही वेळ त्यांच्यात चर्चाही झाली.
नोटाबंदीवरून घमासान...
केंद्रीय अर्थसंकल्पावर आज (बुधवार) लोकसभेत चर्चा सुरु असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी अर्थसंकल्प लोकविरोधी असल्याची टीका केली. शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी संसद संकुलात राहुल गांधी यांची भेट घेत चर्चा केली.
बॅनर्जी नोटाबंदीचा उल्लेख करत असताना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना अडवले. माननीय सदस्य, २०१६ निघून गेले. २०१९ च्या निवडणुकाही संपल्या आहेत. आता या अर्थसंकल्पाबद्दल बोला, असे ते म्हणाले. त्यावर बॅनर्जी गप्प बसले नाहीत. नोटाबंदी कशी अयशस्वी झाली आणि लोकांचा रांगेत कसा मृत्यू झाला, हे त्यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी आरडाओरडा सुरू केला. यावर अध्यक्षांनी बॅनर्जी यांना अर्थसंकल्पावर बोलण्यास सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना बॅनर्जी म्हणाले की, जेव्हा भाजपचे खासदार नेहरूंबद्दल बोलत होते, तेव्हा तुम्ही गप्प बसला होता आणि मी नोटाबंदीबद्दल बोलतोय तेव्हा ते तुम्हाला टोचतेय. हा पक्षपातीपणा चालणार नाही साहेब.