Om Birla To Pappu Yadav: नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशला झुकतं माप देण्यात आल्यानं विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. संसदेच्या कामकाजादरम्यान एक मजेशीर प्रकार पाहायला मिळाला.
संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना हा सर्व प्रकार घडला. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून प्रश्नांची उत्तरं दिली जात होती, तर दुसरीकडं विरोधी पक्षनेत्यांकडून अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. बिहार आणि आंध्र प्रदेशला खूप काही दिले गेलं, तर इतर राज्यांना काहीच देण्यात आलं नाही, असा आरोप काही विरोधी नेत्यांनी केला. दरम्यान, पूर्णियाचे खासदार पप्पू यादवही उभे राहिले.
खासदार पप्पू यादव म्हणाले की, पूर्णिया विमानतळ अद्याप सुरू झालेले नाही. १५ एकर जमीनही राज्य सरकारनं संपादित केली आहे. त्यानंतर ते कधी सुरू होईल, अशी विचारणा त्यांनी केली. त्यांच्या प्रश्नाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी उत्तर दिलं.
दरम्यान, पप्पू यादव यांना पुन्हा काही विचारायचं होतं, तेव्हा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले की, पप्पूजी बसा, अन्यथा लोक म्हणतील की, बिहारला खूप काही देत आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पावर निशाणा साधणाऱ्या नेत्यांवर हा ओम बिर्ला यांचा हा एकप्रकारे टोला होता. तर काही म्हणतात बिहारला सर्व काही दिलं तर काही म्हणतात बिहारला काहीच मिळालं नाही. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपच्या मित्रपक्षांनी मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सर्वसाधारण अर्थसंकल्पात बिहारसाठी केलेल्या घोषणांचे कौतुक केले आणि अर्थसंकल्पात केलेल्या उपाययोजना राज्याला विकासाच्या मार्गावर नेतील, असे सांगितले. दरम्यान, बिहारबद्दल बोललो तर, महामार्गांसाठी २६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि पुराचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी १० हजार ५०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर करण्यात आली आहे. बिहारला तीन नवीन द्रुतगती मार्गही देण्यात आले आहेत.