नवी दिल्ली - ओम प्रकाश रावत यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रावत हे मावळते मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांचे स्थान घेतील. तर अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी 23 जानेवारी रोजी आपला पदभार स्वीकारतील. अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ 23 जानेवारी रोजी समाप्त होत आहे. त्यांनी गतवर्षी सात जुलै रोजी तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात, तर अन्य दोन अधिकारी निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहत असतात. मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रपती परंपरेप्रमाणे दोन निवडणूक आयुक्तांमधून एकाची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करतात. दरम्यान, रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्याता आल्यानंतर अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लवासा यांनी याआधी वित्त सचिव म्हणून काम पाहिले आहे. रावत यांच्यासोबतच लवासा हे 23 जानेवारी रोजी पदभार स्वीकारतील.