नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. या निर्णयानंतर आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींबद्दल लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयानंतर काँग्रेसकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, भारतातील लोकशाही धोक्यात आल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही परिस्थितीत खासदार आणि आमदारांना 2 वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणुका लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे सध्या त्यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर, प्रियंका गांधी, जयराम रमेश यांच्यासह बड्या काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकारविरुद्ध आमचा लढा सुरूच राहिल, असे ठणकावले आहे.
काँग्रेस नेतेआणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करुन राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, आमचा लढा सुरूच राहिल. कायदेशीर आणि राजकीय या दोन्ही मार्गाने आम्ही लढाई लढू, आम्ही ना घाबरणार, ना गप्प बसणार, जेपीसी, मोदींशी संलग्नित असलेला अदानी महाघोटाळा, यांऐवजी राहुल गांधींना अपात्र ठरवण्यात आलंय. भारतीय लोकशाही ओम शांती... असे म्हणत जयराम रमेश यांनी तिखट शब्दात राहुल यांच्यावरील कारवाईवर भाष्य केलंय.
नीरव मोदी घोटाला- 14,000 कोटी, ललित मोदी घोटाला- 425 कोटी, मेहुल चोक्सी घोटाला -13,500 कोटी. ज्या लोकांनी देशाचा पैसा लुटला, भाजपा त्यांना वाचवण्यासाठी का प्रयत्न करत आहे, तपासापासून का पळून गेले आहेत?, याउलट जे लोक यांच्याबद्दल प्रश्न विचारतात त्यांच्यावरच केसेस टाकण्यात येत आहेत. भाजपा भ्रष्टाचाऱ्यांचं समर्थन करतेय का, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींच्या कारवाईनंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.