जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू असताना एक घटना घडली. ती घटना अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असताना एका लहान मुलाला वाचविण्यासाठी सीआरपीएफचा जवान धावला आणि त्याला सुरक्षित ठिकाणी नेले. या लहान मुलाला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, लहान मुलाचा जीव वाचविल्याबद्दल या जवानाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी याला प्रसिद्धीचे एक 'साधन' असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या फोटोतून भारतीय लष्कर हे सिद्ध करू इच्छिते की 'आम्ही चांगले आहोत आणि ते वाईट आहेत'. ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी याबद्दल ट्विट केले आणि लष्कराला उदारतेचा फोटो शेअर न करण्याचे आवाहनही केले आहे.
ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काश्मीरमधील रक्तरंजित संघर्षामध्ये प्रत्येक गोष्ट प्रसार करण्याचे साधन बनते. आम्ही चांगले आहोत आणि ते वाईट आहेत असा संदेश देण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाचे दु: ख जगभर पसरले आहे. त्याचे दु: ख चित्रण न करताही आपण त्याचे दु: ख समजू शकतो. त्यामुळे कृपया, हे (फोटो) शेअर करू नका."
याशिवाय, "वर्दी असणाऱ्या जवानांकडून यापेक्षा कमी अपेक्षा करीत नाही, कारण त्यांनी मुलाला वाचविले आहे. यासाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. मात्र, आम्ही हा फोटो काढणे आणि तीन वर्षाच्या मुलाच्या वेदनांचा वापर करणे, जसे की आज करण्यात येत आहे. त्यापेक्षा त्यांच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो," असे ओमर अब्दुला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्या मृत व्यक्तीचा तीन वर्षांचा नातू तिथेच होता. आजोबांना जमिनीवर निपचित पडलेले पाहून नातू त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र आजोबा उठत नसल्याचे पाहून तो रडू लागला. दरम्यान दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता. त्यामुळे त्या लहान मुलाच्या जीवालाही धोका होता.
लहान मुलाचा जीव संकटात असल्याचे पाहून सीआरपीएफचा जवान त्याचा जीव वाचवण्यासाठी धावला. त्या मुलाला एका हातात घेतले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. या लहान मुलाला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लहान मुलाच्या चेहऱ्यावरची निरागसता, त्याच्या डोळ्यातले अश्रू आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या जवानाच्या चेहऱ्यावरील भाव अगदी स्पष्टपणे दिसत आहेत.
आणखी बातम्या...
चीनला आणखी एक धक्का; BSNL-MTNL कडून 4G टेंडर रद्द!
'त्या' एका घटनेमुळं बदललं आयुष्य अन् बनली आयपीएस अधिकारी!