श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. ओमर अब्दुल्ला यांची मंगळवारी सात महिन्यांच्या स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यात आली. पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याला राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला विशेष दर्जा गेल्या ५ आॅगस्ट रोजी रद्द करण्यात आला तेव्हापासून डॉ. अब्दुल्ला यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.त्यांची बहीण सारा पायलट यांनी या स्थानबद्धतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. सुमारे दोन महिन्यांनंतर ही याचिका गेल्या १८ मार्च रोजी प्रथमच सुनावणीस आली तेव्हा न्यायालयाने, डॉ. अब्दुल्ला यांना स्वत:हून मुक्त करण्यास तयार आहात का, अशी विचारणा जम्मू-काश्मीर सरकारला केली होती. त्या पार्श्वभूमीवर कदाचित या स्थानबद्धतेचे कायदेशीर समर्थन करणे अशक्य असल्याची जाणीव झाल्याने त्यांच्या मुक्ततेचा निर्णय घेण्यात आला असावा, असे समजते.Þडॉ. अब्दुल्ला यांचे वडील व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनाही असेच स्थानबद्ध केले गेले होते. त्यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती व न्यायालयाने प्रतिकुलता दाखविल्यावर त्यांचीही राज्य सरकारने अशीच स्वत:हून मुक्तता केली होती. जम्मू-काश्मीरच्या अनेक नेत्यांना स्थानबद्ध केले गेले. (वृत्तसंस्था)मुफ्ती यांच्या कन्येकडून स्वागत- अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेनंतर आता माजी मुख्यमंत्री व पीपल्स कॉन्फरन्सच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती या बड्या नेत्यांपैकी एकट्याच अजूनही स्थानबद्धतेत आहेत. त्याच्या कन्या इल्तिजा यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या सुटकेचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण, महिलांचा राजकारणात सहभाग याबाबत आपल्याकडे सर्वच जण बोलतात; पण आपले केंद्र सरकार मात्र एका महिलेलाच घाबरत असून, तिला सोडण्यात टाळाटाळ करीत आहे.
ओमर अब्दुल्ला यांची सात महिन्यांनी मुक्तता, मेहबुबा मुफ्ती अटकेतच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 1:59 AM