ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1- पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक हे एका न्यूज चॅनेलच्या अँकरने विचारलेल्या अपमानजक प्रश्नाचं उत्तर होतं, असा खुलासा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला. पर्रीकरांनी केलेल्या या खुलाशावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे.
"न्यूज चॅनेलच्या अँकरने अपमानजनक प्रश्न विचारला म्हणून सर्जिकल स्ट्राईकची आखणी करण्यात आली, याला काय म्हणायचं ! न्यूज अँकरच्या याच प्रश्नामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान अधिक मोठा संघर्ष पेटला असता. तरीही असले निर्णय करणाऱ्यांच्या हाती आपण सुरक्षित असल्याची भावना आपण जोपासणं अपेक्षित आहे!, असं ट्विट जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.
"अशा प्रकारच्या निर्णया घेण्याच्या प्रक्रियेमुळे आपण सुरक्षित आहोत का?, असा सवालही उमर अब्दुला यांनी विचारला आहे.
The #SurgicalStrike had nothing to do with #Uri. It was planned because a minister was asked "an insulting question". What does one say!— Omar Abdullah (@abdullah_omar) July 1, 2017
"भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर एका टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना अपमानजनक सवाल विचारला होता. हा माझ्यासाठी एक अपमान होता. यामुळेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना आखली", असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यवसायिकांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "मी नोव्हेंबर 2014 मध्ये जेव्हा संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्विकारला तेव्हा संरक्षण मंत्रालय पुर्णपणे ढासळलेलं होतं. पुर्णपणे गोंधळाचं वातावरण होतं. याचवेळी मनोहर पर्रीकरांनी भारत-म्यानमार सीमारेषा आणि भारत-पाकिस्तान सीमेवर करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसंबंधी माहिती दिली. कशाप्रकारे या सर्जिंकल स्ट्राईकचं प्लानिंग करण्यात आलं हेदेखील त्यांनी सांगितलं. पर्रीकर यांनी सांगितलं की, "जेव्हा मला मणिपूरमध्ये 6 डोग्रा रेजिमेंटवर हल्ला झाल्याची आणि त्यात 18 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते मला खूप अपमानजक वाटलं. माझ्यासाठी तो वैयक्तिक अपमान होता". "नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँडसारख्या छोट्या दहशतवादी संघटनेकडून इतक्या भारतीय जवानांचा मृत्यू होणं हा माझ्यासाठी अपमानच होता", असं पर्रीकर यांनी सांगितलं. यानंतर 8 जून रोजी भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेत अतिरेक्यांचा खात्मा केला होता.
आणखी वाचा :
सर्जिकल स्ट्राईक एका न्यूज अँकरच्या अपमानाचं उत्तर होतं - मनोहर पर्रीकर
"आम्ही कोणतीही माहिती दिली नसताना ही बातमी लीक झाली होती. मात्र एका प्रश्नाने माझा अपमान झाला. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड एका कार्यक्रमात कशाप्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात येतो याची माहिती सांगत होते. यावेळी न्यूज अॅकरने त्यांनी तुम्ही हिच हिंमत वेस्टर्न फ्रंटवर दाखवणार का ? असा सवाल विचारला. एक यशस्वी सर्जिंकल स्ट्राईक केल्यानंतर हा माझ्यासाठी अजून एक अपमान होता. मात्र मी ते शांतपणे ऐकून घेतलं, आणि वेळ आल्यावर याचं उत्तर द्यायचं ठरवलं", असं मनोहर पर्रीकरांनी सांगितलं.
पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 15 महिन्यांपासून तयारी सुरु होती. 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 9 जूनपासून म्हणजे 15 महिने आधीच तयारी सुरु झाली होती असा खुलासा मनोहर पर्रीकरांनी केला आहे.