हरिद्वार - आपण प्रॉपर्टीवरून नात्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. पण, हरिद्वारमध्ये एक अजबच प्रकरण समोर आले आहे. येथे, नातवंडाचे सुख न दिल्याने वृद्ध आई-वडिलांनी आपला मुलगा आणि सुनेविरोधात थेट न्यायालयाचाच दरवाजा ठोठावला आहे. हरिद्वार येथील थर्ड एसीजे एसडी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात याचिकाकर्त्यांनी मुलाच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालेले सुमारे 5 कोटी रुपये परत मागितले आहेत.
यासंदर्भात, न्यूज18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित वृद्ध दांपत्याचे वकील अरविंद कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले, की संजीव रंजन प्रसाद हे बीएचईएलमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते पत्नी साधना प्रसाद यांच्यासह एका हाउसिंग सोसायटीमध्ये राहत आहेत. या दांपत्याने 2016 मध्ये आला एकुलता एक मुलगा श्रेय सागर याचे लग्न नोएडातील शुभांगी सिन्हा हिच्याशी लाऊन दिले होते. श्रेय सागर पायलट आहेत. तर त्यांची पत्नी शुभांगीदेखील नोएडामध्ये नोकरी करते. या वद्ध दांपत्याने न्यायालयात प्रार्थना पत्र देत, त्यांचा मुलगा आणि सून लग्नाला 6 वर्षे होऊनही मुलाला जन्म देत नाहीत. यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या मानसिक मनस्तापातून जावे लागत आहे, असे म्हटले आहे.
पालन पोषणासाठी खर्च झालेले पैसे मागितले परत -खरे तर, आपल्या अपत्याच्या पालन पोषणासाठी आई-वडील आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई लावत असतात. मात्र हरिद्वारमधील या दांपत्याने आपल्या मुलाच्या पालन पोषणासाठी खर्च केलेले जवळपास 5 कोटी रुपये सून आणि मुलाकडून परत मिळवून देण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली आहे. एवढेच नाही, तर, मुलाला एवढे सक्षम बनवूनही, आपल्याला म्हातारपणी एकटेच राहावे लागत असेल, तर हे आपल्यासोबत प्रतारणे प्रमाणे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. वृद्ध दांपत्याच्या याचिकेवर न्यायालयाने हे प्रकरण दाखल करून घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे.