नवी दिल्ली – कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा भारतात दहशत पसरली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तिसरी लाट धडकण्याचे संकेत मिळत आहेत. मागील २४ तासांत कोरोनाचे १ लाख १७ हजार १०० रुग्ण आढळले. बुधवारच्या तुलनेत तब्बल २८ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. बुधवारी देशात ९० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. भारतात जवळपास ७ महिन्यांनी रुग्णसंख्या १ लाखांच्या वर गेली आहे. त्याआधी ६ जूनला भारतात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते.
देशात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख २६ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात ५ राज्यात कोरोना संक्रमणाने वेग घेतला आहे. त्यात महाराष्ट्र ३६ हजार २६५, पश्चिम बंगाल १५ हजार ४२१, दिल्ली १५ हजार ९७, तामिळनाडू ६ हजार ९८३ तर कर्नाटकात ५ हजार ३१ रुग्ण आढळले आहेत. भारतात एकूण रुग्णांपैकी ६७.२९ टक्के रुग्ण केवळ याच ५ राज्यात आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी ३०.९७ टक्के रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत.
भारतात मागील २४ तासांत ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४ लाख ८३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांत सर्वाधिक २२१ मृत्यू केरळात झाले आहेत. त्याशिवाय बंगालमध्ये ९ लोकांचा जीव गेला आहे. भारतात रिकवरी रेट ९७.५७ टक्के आहे. मागील २४ तासांत ३० हजार ८३६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात ३ कोटी ४३ लाख ७१ हजार ८४५ लोकं कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
देशात ३ लाख ७१ हजार सक्रीय रुग्ण
भारतात सध्या ३ लाख ७१ हजार सक्रीय रुग्णसंख्या आहे. मागील २४ तासांत ८५ हजार ९६२ सक्रीय रुग्णसंख्या वाढली. देशात १,४९, ६६, ८१, १५६ कोरोना लसीचे डोस दिले गेलेत. तर मागील २४ तासांत ९४ लाख ४७ हजार ५६ डोस देण्यात आले आहेत.
देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजारांवर पोहचली
देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३,००७ इतकी झाली आहे. अलीकडेच त्यातील १ हजार १९९ रुग्ण बरे झालेत. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात ८७६, दिल्लीत ४६५, कर्नाटक ३३३, राजस्थान २९१, केरळ २८४, गुजरात २०४ समोर आलेत. त्यातील तामिळनाडू १२१, हरियाणा ११४, तेलंगाणा १०७, ओडिशा ६०, उत्तर प्रदेश ३१, आंध्र प्रदेश २८, बंगाल २७ तर आसाम ९, मध्य प्रदेश ९, उत्तराखंड ८ रुग्ण समोर आले आहेत.