देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण कर्नाटकमध्येच सापडला होता. आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची बाधा झाली होती. आता पुन्हा एकदा कर्नाटकने देशाला हादरविले आहे. कर्नाटकातील दोन कॉलेजमध्ये 33 कोरोनाबाधित विद्यार्थी सापडले असून त्यापैकी 5 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कर्नाटकमधील दोन शिक्षण संस्थांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एका संस्थेत 14 तर दुसऱ्या संस्थेत 19 कोरोना बाधित सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या 33 पैकी पाच जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याने चिंता वाढली आहे. याशिवाय युकेवरून आलेला एक प्रवासी ओमायक्रॉनबाधित सापडला आहे.
कर्नाटकातील हे रुग्ण आता स्थानिक संक्रमणाला सुरुवात झाल्याची चिन्हे आहेत. एकाच वेळी एकाच ठिकाणी एवढे संक्रमित मिळणे ही धोक्याची घंटा आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. देशात शंभरीपार हे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
हाँगकाँग विद्यापीठाने ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा 70 टक्के अधिक संक्रमक आहे, असे म्हटले आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा 1.5 दिवसांचा असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. ब्रिटनमध्ये वेगाने रुग्णवाढ होऊ लागली आहे. भारतात आता बुस्टर डोससाठी चर्चा सुरु झाली आहे.