नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या ओमायक्रॉनमुळे (Omicron) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता ताजनगरी आग्रा येथून जवळपास 45 विदेशी पर्यटक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आग्रा येथील आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट अलर्ट दरम्यान, आग्रा येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे विदेशी पर्यटकांचा शोध घेण्यासाठी आता आरोग्य विभाग आणि लोकल इंटेलिजन्स युनिट (LIU) च्या टीम कामाला लागल्या आहेत.
कोरोनाच्या ओमायक्रान व्हेरिएंटचा धोका असताना हे सर्व विदेशी पर्यटक आग्र्याला पोहोचले. या सर्व पर्यटकांनी कोरोनाची चाचणी केली नाही. यासंदर्भातील माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि प्रशासनाने या 45 विदेशी पर्यटकांचा शोध घेण्यासाठी चार जलद प्रतिसाद पथके तयार केली आहेत. आग्रा पोलिसांच्या लोकल इंटेलिजन्स युनिट म्हणजेच LIU ची टीमही परदेशी पर्यटकांची माहिती गोळा करण्यात गुंतलेली आहे. या 45 विदेशी पर्यटकांच्या शोधात आग्रा येथील सर्व हॉटेल्सचीही तपासणी करण्यात येत आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अरुण कुमार श्रीवास्तव म्हणाले की, ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन शहरात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांचे स्कॅनिंग केले जात आहे. याचबरोबर, कोरोनाची लक्षणे दिसताच पर्यटकांचे नमुने घेतले जात आहेत. बेपत्ता झालेले पर्यटक नोव्हेंबरमध्ये आग्रा येथे आले होते. डॉ. अरुण कुमार श्रीवास्तव यांनीही सांगितले की, पर्यटकांनी आग्रा सोडले असावे. तरीही त्यांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान हॉटेलच्या रजिस्टरमध्ये विदेशी पर्यटकांचे नाव व पत्ता चुकीचा लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे. आता सर्वांचे आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकही बंद झाले आहेत.
दरम्यान, भारतासह जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची (Omicron) चिंता वाढली आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांत हा आकडा 20 च्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 10 जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.