नवी दिल्ली-
जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एक चांगली बातमी भारतासाठी समोर आली आहे. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी कोरोनाशी निगडीत नव्या व्हेरिअंटचा एक महत्त्वाचा डेटा ट्विट केला आहे. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता आणि आता द.आफ्रिकेतील रुग्णसंख्येच्या आलेखात घट होत असल्याचं दिसून येत आहे. आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येनं आपला सर्वोच्च आकडा गाठला असून आता घट होण्यास सुरुवात झाल्याची चिन्ह आलेखातून दिसून येत आहेत.
"दक्षिण आफ्रिकेतून ओमायक्रॉनच्या संदर्भात चांगली बातमी समोर येत आहे. रुग्णालयात रुग्ण दाखल होत आहेत. पण त्याची गती आता कमी झाली आहे. कोरोना विरोधी लसीचा एक डोस किंबा लस न घेतलेलेच बहुतांश लोक शिकार ठरत आहेत. द.आफ्रिकेत झालेल्या अभ्यासानुसार ओमायक्रॉनचा प्रभाव याआधीच्या कोरोना व्हेरिअंटपेक्षा कमी असल्याचं दिसून आलं आहे", असं ट्विट हर्ष गोएंका यांनी केला आहे. यात त्यांनी रुग्णवाढीचा आलेख देखील ट्विट केला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ विटवॉटर्सरँडमध्ये एपिडेमायोलॉजीच्या प्रोफेसर शेरिल कोहेल यांच्या म्हणण्यानुसार द.आफ्रिकेत ओमायक्रॉन याआधीच्या कोरोना व्हेरिअंटपेक्षा कमी प्रभावी दिसून येत आहे. यातच गोएंका यांनी ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या ग्राफमधून चांगले संकेत दिसून येत आहेत. ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं दिसून आलेली नाहीत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल देखील व्हावं लागलेलं नाही. अत्यंत कमी रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि यातील बहुतांश रुग्णांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. अर्थात यामुळे निष्काळजीपणा बाळगणं अत्यंत चुकीचं ठरणार आहे.
देशात रविवारपर्यंत ओमायक्रॉनचे एकूण रुग्ण ४२२ इतके झाले आहेत. यात महाराष्ट्रात १०८ इतके सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिल्ली ७९, गुजरात ४३, तेलंगणा ४१ आणि केरळ ३८ रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारनंही देशातील १० राज्यांमधील आपलं पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये पथक पाठवण्यात येणार आहे. देशातील ओमायक्रॉनच्या वाढच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीत नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे.