नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट पसरण्याचा धोका वर्तवला जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अनेक नियमात बदल करण्यास सुरुवात केली आहे. होम आयसोलेशनबाबत नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने सौम्य आणि विना लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी नवीन नियमावली काढली आहे.
केंद्रीय मंत्रालयाने म्हटलंय की, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर ७ दिवस आणि ताप न आल्यास ३ दिवसानंतर होम आयसोलेशनमधून रुग्णाला सूट दिली जाईल आणि आयसोलेशन संपेल. त्याचसोब होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. आकडेवारी पाहता मागील ९ दिवसांत पटीने कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये ३ दिवसात दुप्पट संख्या होत आहे. ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता नसल्याने होम आयसोलेसनबाबत नियमावली जारी केली आहे.
तसेच भारतात डेल्टा व्हेरिएंटने ज्याप्रकारे परिस्थिती निर्माण केली तशी दक्षिण आफ्रिकेत डेल्टा व्हेरिएंटने केली नाही. त्यामुळे ओमायक्रॉनबाबत भारतात काय उपाययोजना केल्या जातात त्यावर सध्या आढावा घेतला जात आहे. देशात जे आधीपासून आजारी आहेत त्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे रुग्ण वाढले तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही वाढेल. होम आयसोलेशनची नवी नियमावली अंमलात आणण्यासाठी केंद्राने राज्यांना आदेश दिले आहेत. राज्यातील नियंत्रण कक्ष याबाबत परिस्थितीवर लक्ष ठेवेल. जर कुठल्याही रुग्णाची तब्येत बिघडली आणि त्याला होम आयसोलेशनहून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली तर त्यावेळी रुग्णवाहिका, चाचणीपासून बेड उपलब्ध होण्यास मदत मिळेल.
होम आयसोलेशनचे नियम काय आहेत?
वयोवृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याची परवानगी मिळेल.
सौम्य लक्षण असणाऱ्यांना घरीच राहावं लागेल. त्यासाठी योग्य व्हेंटिलेशन असणं गरजेचे आहे.
रुग्णांना ट्रिपल लेयर मास्क घालणे आवश्यक, त्याशिवाय जास्तीत जास्त लिक्विड घेण्याचा सल्ला
HIV रुग्ण, कॅन्सर रुग्ण आणि ज्यांचे ट्रान्सप्लांट झालंय अशांना होम आयसोलेशनसाठी डॉक्टरांची परवानगी आवश्यक आहे
विना लक्षण आणि सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन सेच्युरेशन ९३ टक्क्याहून अधिक असल्यास होम आयसोलेशनची परवानगी
माइल्ड आणि एसिम्प्टोमेटिक रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणं गरजेचे
आवश्यकता भासल्यास चाचणी आणि हॉस्पिटलमध्ये बेडची सुविधा मिळेल. परंतु सीटी स्कॅन, चेस्ट एक्स रे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काढू नये