नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या ओमयाक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 6 महिन्यांनंतर रविवारी दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्ली एम्सच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्यासाठी ओमायक्रॉन व्हेरिएंट जबाबदार असू शकतो. रविवारी दिल्लीत कोरोनाचे 107 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 10 दिवसांनंतर कोरोनामुळे एक मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये ओमायक्रॉनची 2 नवीन प्रकरणे आढळल्यामुळे राजधानीत आतापर्यंत या नवीन व्हेरिएंटची एकूण 24 प्रकरणे समोर आली आहेत.
एम्समधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर संजय राय यांनी दिल्लीतील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनची संसर्गक्षमता खूप जास्त आहे आणि जेव्हा हा व्हेरिएंट अतिसंवेदनशील लोकांपर्यंत पोहोचतो, तेव्हा तो आधी वेगाने पसरतो आणि नंतर हळूहळू त्याचा आलेख खाली जाऊ लागतो. महामारीच्या दुसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती भारतात पाहायला मिळाली, असे प्रोफेसर संजय राय यांनी सांगितले.
प्रोफेसर संजय राय यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही व्हायरससाठी थंडीत आणि उन्हाळ्यात संर्गगाचा प्रादुर्भाव होणे कठीण असते, परंतु थंडीमुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. याशिवाय, प्रोफेसर संजय राय यांनी सांगितले की, व्हायरससाठी सर्वोत्तम तापमान 20 ते 30 अंशांच्या दरम्यान असते. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने या व्हायरससाठी अधिक अनुकूल आहेत. या महिन्यांत संसर्गाचा धोका जास्त असतो.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगातील सर्व देशांची चिंता वाढवली आहे. सर्वात आधी हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळला त्यानंतर जगातील 91 देशांमध्ये हा पसरला आहे. भारतातही 13 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. या रुग्णांची संख्या 100 च्यावर पोहचली असून दिवसेंदिवस ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे.
कोरोना लस घेतलेल्या 90 % भारतीयांना संसर्गाचा धोकाभारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी तब्बल 90 % लोकांना देखील ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीच्या क्षमतेवर ब्रिटनमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यानुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. पण यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल असंही म्हटलं आहे.