नवी दिल्ली: देशात सध्याच्या घडीला दररोज १० हजारपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी आहे. मात्र ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. देशात आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा लवकरच वाढू शकतो. राष्ट्रीय कोविड-१९ सुपरमॉडेल समितीनं याबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट येईल. मात्र ही लाट दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल, असं समितीचे प्रमुख विद्यासागर यांनी सांगितलं.
कोरोनाची तिसरी लाट पुढील वर्षाच्या सुरुवातीला येऊ शकेल, असं विद्यासागर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. अनेकांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यानं तिसऱ्या लाटेचा परिणाम फार जाणवणार नाही. पण तिसरी लाट नक्की येईल. सध्या दररोज कोरोनाच्या साडे सात हजारच्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे. ओमायक्रॉननं डेल्टा व्हेरिएंटची जागा घेतल्यानंतर हा आकडा वेगानं वाढेल, असं आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक असलेल्या विद्यासागर यांनी सांगितलं.
देशात कोरोनाची तिसरी लाट टोक गाठेल, त्यावेळी दररोज दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होईल, असा अंदाज विद्यासागर यांनी वर्तवला. 'हा आमचा अंदाज आहे, भविष्यवाणी नव्हे. तिसरी लाट आल्यावर वाईटातल्या वाईट स्थितीत देशात दररोज १.७ ते १.८ लाखापेक्षा कमी रुग्ण आढळून येतील. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत हा आकडा निम्म्याहून कमी आहे. जानेवारीत तिसरी लाट येईल. ती फेब्रुवारीत टोक गाठेल' असं विद्यासागर म्हणाले.
सध्याच्या घडीला जगभरात ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १०० च्या पुढे गेला आहे. देशात पहिला ओमायक्रॉन रुग्ण २ डिसेंबरला आढळून आला होता. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत रुग्णांची संख्या १०० च्या पुढे गेली देशातील ११ राज्यांत ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. ब्रिटन, अमेरिकेत ओमायक्रॉननं रुग्णसंख्येचे विक्रम मोडले आहेत.