भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने पसरण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक लोकही कोणती ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना ओमायक्रॉनने बाधित सापडल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रानचे 87 रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात तेलंगानामध्ये 4 आणि कर्नाटकमध्ये 5 नवे रुग्ण सापडल्याने वेग वाढू लागला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.
भारतात आता पर्यंत कोरोनाचे 87 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण सापडले असून त्यानंतर राजस्थानचा नंबर लागतो. राजस्थानमध्ये 17, दिल्ली 10, केरळ 5, गुजरात 5, कर्नाटक 8, तेलंगाना 6, बंगाल-तामिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये आणि चंदीगढमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण समोर आले आहेत.
कर्नाटकात आज सापडलेल्या 5 रुग्णांपैकी 3 रुग्ण परदेशातून आलेले आहेत. तर दोघे दिल्लीहून बंगळुरुला आले होते. परदेशातून आलेल्या रुग्णांपैकी युकेहून 19 वर्षांचा एक तरुण, नायजेरियातून 52 वर्षांचा व्यक्ती आणि आफ्रिकेतून 33 वर्षांचा तरुण असे सापडले आहेत.
जगातील 60 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट पोहोचला आहे. कोरोना ओमायक्रॉनने (Corona Omicron Cases) भारताचे टेन्शन वाढविले आहे. आधीच रुग्ण वाढत असताना देशावर आता कम्युनिटी स्प्रेडची टांगती तलवार लटकू लागली आहे. डब्ल्यूएचओने ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही वेगाने पसरणार असल्याने हॉस्पिटलनी तयार रहावे असा इशारा नुकताच दिला आहे.