नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची एकूण संख्या तब्बल 3 कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,189 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 387 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,79,520 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून एकूण संख्या 415 वर गेली आहे. 17 राज्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त धोका हा दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातला आहे.
ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेशनचा विचार करून अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाचा वेग मंदावत असतानाच ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांनी प्रशासनाचं टेन्शन वाढवलं आहे. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. केंद्र सरकार अलर्ट झालं असून कमी लसीकरण झालेल्या 10 राज्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अशा राज्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या टीम पाठवण्यात येत आहेत.
10 ऱाज्यांमध्ये लसीकरण कमी झालं असून कोरोना रुग्णांची संख्या मात्र जास्त आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये टीम पाठवण्यात येणार आहेत. ओमायक्रॉनच्या भीतीचे हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अन्य राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रिकव्हरी रेट सध्या 98.40 टक्के झाला आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. याच दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. "पॅरासिटेमॉल आणि मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाऊन ओमायक्रॉनचे रुग्ण बरे होत आहेत" असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
"पॅरासिटेमॉल, मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांनी ओमायक्रॉनचे रुग्ण होताहेत बरे"
दिल्लीमधील लोक नायक जयप्रकाश रुग्णालयामध्ये (एलएनजेपी) उपचार घेत असणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांवर सध्या पॅरासिटेमॉल आणि मल्टी व्हिटॅमिन्स या गोळ्यांच्या सहाय्याने उपचार केले जात आहेत. या रुग्णावर सुरू असणाऱ्या उपचारासंदर्भात रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली. दिल्ली सरकारच्या सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये आतापर्यंत 40 ओमायक्रॉनबाधित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. "ओमायक्रॉनच्या या रुग्णांना उपचारादरम्यान केवळ मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांचा वापर करण्यात आला आहे. या रुग्णांना इतर कोणत्याही गोळ्या देण्याची गरज आम्हाला जाणवली नाही" असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे.