उदयपूर:राजस्थानमधील उदयपूरमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराची लागण झालेल्या 73 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या या प्रकारामुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. वृद्धाचा मृत्यू पोस्ट-कोविड न्यूमोनियामुळे झाला आहे. 21 आणि 22 डिसेंबर रोजी चाचणीत तो निगेटिव्ह आले, पण 25 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली, अशी माहिती सीएमएचओ डॉ. दिनेश खराडी यांनी दिली.
डॉ.दिनेश खराडी यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या व्यक्तीला मधुमेह व उच्च रक्तदाबासह हायपोथायरॉईडीझमचा त्रास होता. अशा स्थितीत विषाणू शरीरावर जास्त परिणाम करतात. तसेच, जर तुम्हाला मधुमेहासारखा आजार असेल तर धोका वाढू शकतो. राजस्थानमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 69 रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन बाधितांच्या यादीत राजस्थान देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
उदयपूरमध्ये 4 रुग्णउदयपूरमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनची 4 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 27 डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये ओमायक्रॉनचे नवीन प्रकरण समोर आले. यापूर्वी 25 डिसेंबर रोजी तीन प्रकरणे समोर आली होती. यामध्ये पती, पत्नी आणि 68 वर्षीय महिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आली. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह येणारा 73 वर्षीय पुरुष हा चौथा व्यक्ती होता.
महाराष्ट्रात 52 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
गुरुवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनमुळे 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पुण्याजवळील पिंपरी-चिंचवडमधील व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वी नायजेरियाहून परतला होता. त्याची कोविड चाचणीही करण्यात आली होती, परंतु अहवाल निगेटिव्ह आला होता. 28 डिसेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर संशयाच्या आधारे त्याचा नमुना पुण्याला जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला, त्यानंतर ओमायक्रॉनची पुष्टी झाली.