लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगभरात ओमायक्राॅनचे १ लाख ५१ हजार ३६८ रुग्ण सापडले असून त्यातील २६ जणांचा मृत्यू झाला. हा नवा विषाणू १०८ देशांमध्ये पसरला आहे. इंग्लंड, डेन्मार्क, कॅनडा, नॉर्वे, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इस्टोनिया या दहा देशांत ओमायक्रॉनचा मोठा प्रसार झाला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
नैसर्गिक संसर्गानंतर किंवा लसीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती, तसेच अँटिबॉडीज उपचार या कशालाही ‘ओमायक्रॉन’ दाद न देण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दक्षता बाळगावी लागेल. नेचर नियतकालिकात संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘ओमायक्रॉन’वर मात करण्यासाठी नव्या लसी व उपचार शोधणे आवश्यक आहे. कोलंबिया व हाँगकाँग विद्यापीठांतील संशोधकांनी म्हटले आहे की, ‘ओमायक्रॉन’च्या स्पाइक प्रोटिनमध्ये होणाऱ्या अनेक परिवर्तनांमुळे तो सध्याच्या सर्व लसी व उपचार निष्प्रभ करू शकेल.
बूस्टर घेणारे अधिक सुरक्षित
मॉडेर्ना, फायझर, ॲस्ट्राझेनेका, जॉन्सनच्या लसी घेतलेल्यांच्या शरीरातील अँटिबॉडीजनाही हा विषाणू दाद देत नसल्याचे आढळून आले आहे. फायझर वा मॉडर्नाचा बूस्टर डोस ज्यांनी घेतला आहे, ते अधिक सुरक्षित असतील, असेही निष्कर्षात म्हटले आहे.