नवी दिल्ली : ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग व कोरोना रुग्णसंख्या यांच्यात जिथे वाढ होत असेल, तिथे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक स्तरावर कडक निर्बंध लागू करावेत. तसेच ख्रिसमस व नववर्ष स्वागत समारंभातील गर्दीवर नियंत्रण राखावे, अशा सूचना केंद्रीय गृह खात्याचे सचिव अजय भल्ला यांनी सोमवारी पुन्हा दिल्या आहेत.त्यांनी म्हटले आहे की, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अतिशय सतर्क राहणे आवश्यक आहे. चाचणी, रुग्णांचा शोध, लसीकरण, उपचार व प्रतिबंधक नियमांचे पालन या पंचसूत्रीचा वापर करूनच कोरोना संसर्गाचा प्रसार रोखता येईल. ओमायक्रॉनची संसर्गशक्ती ही डेल्टापेक्षा तीनपट अधिक आहे. त्यामुळे कोरोना उपचार यंत्रणेपुढे नवीन आव्हान निर्माण झाले आहे. अजय भल्ला यांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेल्या देशांमध्ये रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.
९ रुग्णांच्या संपर्कातील १६४ जणांची चाचणीमध्य प्रदेशच्या इंदूरमधील ओमायक्रॉनच्या ९ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १६४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे अहवाल हाती येईपर्यंत या लोकांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग आणखी फैलावू नये म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयाची पाहणीगुजरातमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, या रुग्णांना मिळणारे उपचार व आरोग्य यंत्रणेच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर शासकीय रुग्णालयाला सोमवारी सकाळी अचानक भेट दिली.
लक्ष केंद्रित करावे...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीचा २३ डिसेंबर रोजी आढावा घेतला होता. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिक व अधिकारी या सर्वांनीच सतर्क व सावध राहावे, असे मोदी यांनी म्हटले होते. राज्यांनी आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अशा सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिल्या होत्या.