नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील ७ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ सर्वांसाठी चिंताजनक बनली आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्यामुळे बाजारात खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
स्टोअर शेल्फ आणि ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरुन गरजेच्या वस्तू गायब झाल्या आहेत. दररोजच्या वापरात असणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची(Essential Goods) ऑनलाईन विक्री मागील दिवसांत १५ टक्क्यांनी वाढली आहे. कोरोना महामारी संक्रमणात वेग आला आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मार्केट जाण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंगवर लोकांनी भर दिला आहे. त्याचसोबत दुकानांच्या वेळेवर घालण्यात आलेले निर्बंधही ऑनलाईन खरेदीसाठी फायदेशीर ठरले आहेत.दिल्लीत तर ऑड इवन आधारावर ८ वाजेपर्यंत मार्केट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन खरेदी वाढली आहे.
ईटीच्या रिपोर्टनुसार, जवळपास सर्व प्रकारच्या वस्तू ऑनलाईन विक्रीत १५ टक्के वाढ झाली आहे. चॉकेलट, पेय, साबण, शॅम्पू, खाण्यापिण्याच्या वस्तू यांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे. सॅनेटायझर, N95 मास्क यांचीही विक्री वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमधून धडा घेत ई कॉमर्स कंपन्यांनी यावेळी पहिल्यापासून तयारी केली आहे. अचानक वाढलेल्या मागणीनं कमाई चांगली होईल अशी आशा कंपन्यांना आहे.
‘या’ वस्तूंच्या मागणीत वाढ
रिपोर्टनुसार, पार्ले उत्पादनाचे हेड मयांक शाह म्हणाले की, ई कॉमर्सच्या माध्यमातून होणारी विक्री १०-१५ टक्क्यांनी वाढली आहे. जोपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम राहील तोवर बाजारात हाच ट्रेंड राहिल. Blinkit चे प्रवक्ते म्हणाले की, मागील १ आठवड्यात पॅकेज्ड फूड आणि हायजीन प्रॉडक्टची विक्री दुप्पटीने वाढली आहे. तर N95 मास्कच्या विक्रीत एका आठवड्यात ५ पट वाढली आहे.
मागील २४ तासांत ९० हजाराहून जास्त रुग्ण
मागील २४ तासांत देशात कोरोनाचे ९० हजाराहून जास्त रुग्ण आढळले. एक दिवसापूर्वी आढळलेल्या रुग्णांपैकी हा दुप्पट आकडा आहे. ओमायक्रॉन रुग्णांमध्ये वाढ होत २६३० रुग्ण समोर आले. त्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. मागील २४ तासांत एकूण रुग्णांपैकी ६७ रुग्ण केवळ याच ५ राज्यात आढळले आहेत.