मिझोराम, केरळ आणि सिक्कीम या तीन राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक असल्याचे आढळून आले असून स्थिती गंभीर आहे. या अनुषंगाने ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवावे. जिथे रुग्णसंख्या वाढत असेल तिथे जिल्हास्तरावर कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत.
केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुदुचेरी, मणिपूर, प. बंगाल, नागालँड या राज्यांतील १९ जिल्ह्यांत दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्गदर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. तसेच तीन राज्यांतील ८ जिल्ह्यांत संसर्गदर १० टक्क्यांहून जास्त आहे. त्यामुळे २७ जिल्ह्यांवर बारीक लक्ष ठेवावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
दिल्लीत आढळला दुसरा बाधितझिम्बाब्वे आणि द.आफ्रिकेचा प्रवास करून आलेला एक ३५ वर्षीय व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दिल्लीमध्ये ओमायक्रॉन संसर्गाचा हा दुसरा रुग्ण आहे. तर नायजेरियाचा दौरा करून पाच दिवसापूर्वी इंदूरमध्ये आलेल्या एका १४ वर्षीय मुलीला आणि तिच्या ८ वर्षीय भावाला कोरोना झाला असून त्यांचे नमुने दिल्लीला पाठविण्यता आले आहेत.
मुंबईत ४१ दिवसांनंतर पुन्हा ‘शून्य’ बळीओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मुंबईकरांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मुंबईत शनिवारी ४१ दिवसांनंतर पुन्हा एकदा शून्य कोरोना बळींची नोंद झाली.
एखाद्या जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असेल तर तिथे संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. केंद्राने आखून दिलेल्या चौकटीतच हे उपाय योजावेत. जिथे १० टक्क्यांपेक्षा अधिक संसर्गदर आहे किंवा एखाद्या भागात ६० टक्के या रुग्णशय्या कोरोनाबाधितांनी व्यापलेल्या असतील तर अशा ठिकाणी रात्रीची संचारबंदी, लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सणासुदीचे कार्यक्रम यांच्या आयोजनावर बंदी घालणे, असे कडक निर्बंध लागू करावेत. तसेच विवाह, अंत्यसंस्कार या प्रसंगी मर्यादित संख्येने लोक उपस्थित असावेत, असे बंधनही घालावेत, असे राजेश भूषण यांनी स्पष्ट केले आहे.
नवे रुग्ण शोधण्यासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अधिकाधिक कोरोना चाचण्या (अँटिजन, आरटी-पीसीआर) करायला हव्यात. तसेच कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी जनतेला विश्वासात घेऊन कडक उपाय योजावेत. राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव.