नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,495 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 434 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,78,759 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या व्हेरिएंटने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. प्रशासनाची चिंता वाढली आहे. देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असं असताना तामिळनाडूमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. एकाचवेळी 33 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तामिळनाडूमध्ये याआधी फक्त एक रुग्ण आढळून आला होता. मात्र आता 33 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या 34 वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूत फक्त एक रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. गेल्या 24 तासांत चेन्नईत 26, सलेममध्ये 1, मदुराईत 4 आणि तिरुवनमलाईमध्ये 2 असे एकूण 33 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह देशातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या वाढली आहे.
ओमायक्रॉन या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. काहींचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत. ओमाक्रॉनच्या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण यामुळे नागरिकांनी घाबरू नये. कोरोनासंबंधी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. कोरोनाचा धोका वाढला असून 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
ओमायक्रॉनच्या संकटात कोरोनाचा विस्फोट, तब्बल 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह
पश्चिम बंगालमधील (West Bengal) नादिया जिल्ह्यातील एका निवासी शाळेतील किमान 29 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus Cases) लागण झाली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाहर नवोदय विद्यालय, कल्याणीच्या नववी आणि दहावीच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. संक्रमित विद्यार्थ्यांना खोकला आणि सर्दीची लक्षणे असल्याने त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. कल्याणी उपविभागीय अधिकारी (SDO) हिरक मंडळ यांनी शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांचीही कोरोना तपासणी केली जात आहे. रिपोर्ट आल्यावर याबाबत माहिती मिळेल.