नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमायक्रॉन ( Omicron) हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आता जगातील 38 देशांमध्ये पोहोचला आहे. भारतातही या नवीन कोरोना व्हेरिएंटची लागण झालेले तीन लोक सापडले आहेत. या व्हेरिएंटला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्याबाबत सहा राज्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या सहा राज्यांमध्ये केरळ, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.
या राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य मंत्रालय चिंतेत आहे. केंद्राने राज्यांना टेस्ट, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, केरळमध्ये कोरोनामुळे रुग्णांचा वाढता मृत्यूदर आणि वाढत्या रुग्णांवर आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत. तसेच, तामिळनाडूतील तीन आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशीच स्थिती ओडिशा आणि मिझोरामची आहे. येथेही आरोग्य मंत्रालयाने काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना व्हायरसच्या या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 30 हून अधिक देश या नवीन व्हेरिएंटच्या कचाट्यात आले आहेत. भारतही ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्गाची लागण झालेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. भारतात गुरुवारी (दि.03) कोरोना कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमितदोन रुग्ण आढळले आहेत. यानंतर आता गुजरातमधील जामनगरमध्ये (Jamnagar) एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतली होती.
दक्षिण आफ्रिकेत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटला B.1.1529 असे ओळखले जात होते. नंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word).जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, ज्या पहिल्या नमुन्यातून ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. तसेच, या कोरोनाच्या व्हायरसचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत केला आहे.