नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसनं साऱ्या जगासमोर संकट उभं केले आहे. लसीकरणामुळे कोरोना व्हायरसला नियंत्रणात आला. आता हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलेले आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. ओमीक्रॉन असं या व्हेरिएंटचं नाव असून हा व्हायरस डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही वेगाने पसरत असल्याचं WHO नं म्हटलं आहे. त्यामुळे अनेक लोक दहशतीखाली आले आहेत.
यामुळे बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांनी ट्विटमधून लोकांना न घाबरण्याचं आवाहन केले आहे. किरण मुझुमदार –शॉ म्हणतात की, कोरोना महामारीच्या काळात त्याचे अनेक व्हेरिएंट येतील ते त्याचा अविभाज्य भाग आहे. लस त्यावर उपाय आहे. कोरोना हा आजार लसीकरण झालेल्या लोकसंख्येसाठी घातक नाही हे डेटामधून समोर आलं आहे. त्यामुळे सावध राहूया पण मुर्ख बनू नका. मास्क, सॅनिटायझेशन आणि लसीकरण केल्याने आपण सुरक्षित राहू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेतून आलेले २ प्रवाशी कोरोनाबाधित
नव्या व्हेरिएंटने जगभरात खळबळ उडविलेली असताना भारतात दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. बंगळुरूच्या विमानतळावर तपासणीवेळी दोन प्रवासी कोरोना बाधित सापडले. यामुळे बंगळुरु विमानतळावर, आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली होती. बंगळुरुच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे रुग्ण सापडले.
बंगळुरू ग्रामीण उपायुक्त के. श्रीनिवास यांनी शनिवारी सांगितले की, या दोघांना नव्या कोरोना व्हायरसची, ओमीक्रॉनची लागण झालीय की नाही हे तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. जोवर ते नव्या व्हेरिएंटने बाधित आहेत की नाहीत हे समोर येत नाही, तोवर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवले जाणार आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी आणा
सध्या देशात आणि महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा परिणाम दिसत नाही. दुसरी लाट डेल्टा व्हेरिएंटमुळे आली होती. तिसरी लाट या नव्या व्हेरिएंटमुळे येण्याची शक्यता आहे. पण आपण वेळीच त्याला रोखलं तर चिंता करण्याची गरज नाही. परंतु सतर्क राहणं गरजेचे आहे असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. आम्ही सतर्कता बाळगून आहोत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची ७२ तासांपूर्वीची RTPCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. कठोरपणे या प्रवाशांचे स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्यात येईल. परंतु अद्यापही या देशातून येणाऱ्या उड्डाणावर आपण बंदी आणली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे. आम्ही याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहून कळवलंही आहे अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.