नवी दिल्ली: पूर्णपणे कोरोनाच्या छायेत गेलेले २०२१ हे वर्ष संपून २०२२ ची सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे सावट आहे. (Omicron Variant)त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले आहे. देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ५७८ झाली असून आकडा अद्यापही वाढतो आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत.
महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या महत्वाच्या राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर आता उत्तराखंड सरकारनेदेखील नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूचे निर्बंध लागू राहतील.
राज्याचे मुख्य सचिव एस.एस. संधू, यांनी एका आदेशात सांगितले की, सोमवारपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू पुढील आदेशापर्यंत लागू राहील. तथापि, आरोग्य, आरोग्य कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका, पोस्टल सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवांना कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे. एलपीजी, पेट्रोल, डिझेलचे उत्पादन, वाहतूक आणि वितरण यांनाही बंदीतून सूट देण्यात आली आहे, असं संधू यांनी सांगितलं.
दरम्यान, जगातील इतर देशांबरोबरच भारतामध्येही ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील १९ राज्यांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा फैलाव झाला आहे. तसेच जगभरात तब्बल ११६ देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत तीन पट अधिक-
ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत तीन पट अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे नव्हे आव्हान उभे झाले आहे. या पत्रामधून गृहमंत्रालयाने सामान्य नागरिकांनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जे नियम बनवले जातील त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम ५० ते ६१ आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिनियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही या पत्रामधून देण्यात आला आहे.
गर्दी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या फैलावाला निमंत्रण देणारी-
सणांदरम्यान, गर्दी रोखण्यासाठी निर्बंध घालण्याबाबतही राज्यांनी विचार करावा, असा सल्लाही गृहमंत्रालयाने दिला आहे. आधी नाताळ व नववर्ष, त्यानंतर संक्रांत आणि होळी असे सण येत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार, मॉल्समधील गर्दीची अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यामुळे चिंता वाढत आहे. अशा ठिकाणची गर्दी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या फैलावाला निमंत्रण देणारी ठरू शकते.